मुंबईः राज्यात पुन्हा मराठी भाषेवरून वाद झाल्याची घटना घडली आहे. नुकत्याच एका प्रवासी महिलेचा लोकलमध्ये झालेल्या वादाची चित्रफित वायरल झालेली असताना आता नवी मुंबईतील महाविद्यालयाबाहेर एका विद्यार्थ्याने केवळ ‘मराठीत बोला’ असे म्हटल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुलाने व्हॉट्स ॲपवर मराठी बोलण्यासाठी सांगितले. त्यावरून हा वाद झाला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून स्थानिक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी एका कॉलेजच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी होते. काही विद्यार्थी सोमवारी हिंदीमध्ये संदेश पाठवत होते. त्यावर एका विद्यार्थ्याने मराठीत प्रत्युत्तर देत म्हटले, ‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’ ही टिप्पणी वाचून ग्रुपमधील इतर सदस्य संतापले. त्यांनी या मुलावर हल्ला केला.
राज ठाकरे यांनी वरळी येथील सभेत सर्वांना मराठीत बोलण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी मराठीचा अपमान झाल्यास त्याबाबत आमचा पक्ष आक्रमक भूमिका घेईल, असे स्पष्ट केले होते. या आधी मिरा रोड येथील एका दुकानदारावर, तर नांदेडमध्ये सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबईतील घटनेत व्हॉट्स ॲपवरील भाषिक वाद इतका चिघळला आहे. मुलाने व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवल्यानतंर दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता फैयाज नाईक या विद्यार्थ्यासह इतर तिघांनी संबंधित २० वर्षीय विद्यार्थ्यावर वाशीतील महाविद्यालयाबाहेर हल्ला केला. नाईक याने हॉकी स्टिकने त्याच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
‘दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही मारहाण झाली असून, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराला काठीने मारहाण करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,’ असे वाशी विभागाच्या पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रामाक झाले आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी हल्लेखोर विद्यार्थ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.‘आम्ही पीडित विद्यार्थ्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून, गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. ही घटना केवळ भाषेच्या मुद्द्यावरून झालेली नसून, महाराष्ट्रात वाढत चाललेली भाषिक तेढ धोकादायक असल्याचा इशारा देणारी आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.