नाशिकमध्ये लढण्यास सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ फारसे उत्सूक नसतानाच विद्यमान खासदार समीर भुजबळ यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी नाशिकमधील भुजबळ समर्थकांनी शरद पवार यांच्याकडे केली असता, भुजबळ पिता-पुत्र किंवा पुतण्यापैकी एकाला उमदेवारी दिली जाईल, पण उमेदवारी ही भुजबळांकडेच असेल, अशी गुगली पवार यांनी सोमवारी टाकली. २२ पैकी १५ मतदारसंघांमधील उमेदवार अंतिम करण्यात आले असून, पहिली यादी या महिनाअखेर जाहीर केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्याकरिता शरद पवार यांनी दोन दिवस मतदारसंघनिहाय आढावा घेतला. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्याविरोधात मराठा समाजाचा उमेदवार रिंगणात उतरावा, असा मतप्रवाह असल्याने राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नावाची चर्चा आहे. हातकणंगले मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा किंवा पक्षाकडे राहिल्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलाप्पाअण्णा आवाडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव आहे.

काही मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त नावे चर्चेत
शरद पवार स्वत: लढणार नसल्याने माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर किंवा संजय शिंदे यांची नावे चर्चेत आली आहेत. मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले कोणती भूमिका घेतात यावर सारे अवलंबून आहे. मात्र पक्षाच्या मुख्यालयात आज त्यांनी हजेरी लावल्याने भोसले राष्ट्रवादीबरोबर राहण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्याची योजना असली  तरी त्यांच्या अटकेमुळे निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. नदरमध्ये राजीव राजाळे किंवा बबनराव पाचपुते यांचे पुत्र, बुलढाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे किंवा रेखा खेडेकर, शिरुर आमदार वल्लभशेठ बेनके ही नावे चर्चेत आहेत. पवार वगळता सातही विद्यमान खासदारांपैकी एक-दोन बदल होऊ शकतात, असे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सूचित केले.

राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
बारामती – सुप्रिया सुळे, उस्मानाबाद – डॉ. पद्मसिंह पाटील, ईशान्य मुंबई- संजय दिना पाटील, ठाणे – संजीव नाईक, कल्याण- आनंद परांजपे, भंडारा-गोंदिया – प्रफुल्ल पटेल, नाशिक – छगन भुजबळ, दिंडोरी – ए. टी. पवार, हिंगोली – सूर्यकांता पाटील, मावळ – लक्ष्मण जगताप, परभणी – विजय बांभळे ही नावे अंतिम मानली जात आहेत़