मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडून शरद पवार गट विरूध्द अजित पवार गट अशा दोन गटांत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते विभागले गेले आहेत. मात्र तेव्हापासून आपण साहेबांबरोबरच… म्हणत शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्र पिंजून काढण्यात सध्या खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? असे सूचक ट्वीट करत गोंधळ उडवून देणाऱ्या अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा थेट नाव न घेता अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत.
राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांसह बंडखोरी करत अजित पवार यांनी २ जुलैला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात उपस्थित असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यानंतर आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर करून एकूणच झाल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ५ जुलै रोजी येवल्यात झालेल्या सभेतही त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून दबावाखाली येऊन बंडखोरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून मोदींच्या फसव्या राजकारणावरही कडाडून टीका केली.
गेले काही दिवस अमोल कोल्हे सातत्याने जाहीर भाषणातून, समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्टमधून एकूणच महाराष्ट्रातील राजकीय घटनांबद्दल आक्रमक भाष्य करत आहेत. नुकतीच जिममध्ये वजन उचलतानाची आपली ध्वनिचित्रफीत त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. त्या खाली ‘इथे आल्यावर दोन गोष्टी नक्की समजतात… १. जे काही उचलायचं (वजन असो की जबाबदारी)’ ते ‘स्वत:च्या’ ताकदीवर, मोठ्या पदावर बसलेल्या तीर्थरुपांच्या नव्हे’ अशा शब्दांत अजित पवारांसाठी खोचक विधान केले आहे. पुढे आपल्या विधानात ‘जे आणि जेवढं ‘पेलवल’ तेवढच उचलावं…’ असे सांगत बोलण्याविषयीही असेच भान कुठे मिळेल? सध्या अनेकांना त्यांची गरज असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.