मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसरी फेरी लांबणीवर पडल्याने विद्यार्थी चिंतीत आहेत. त्यातच आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशात २ हजार ६५० नव्या जागा वाढवल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये १५० नव्या जागांना मान्यता मिळाली आहे. या जागांचा तिसऱ्या फेरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. केंद्र सरकारने देशातील डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये व जागा वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांसह नवीन जागांना मान्यता देत आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक लांबणीवर टाकल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
त्यातच आता एमसीसीने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देशात २ हजार ६५० जागा वाढवल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १५० जागांचा समावेश आहे. नव्याने मान्यता मिळालेल्या या जागांमुळे देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या १ लाख २६ हजार ७२५ इतकी झाली आहे. हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा वाढल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ३०० जागांना मान्यता मिळाली आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी २५० जागा वाढल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये १५० जागांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १०० आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमध्ये ५० जागांना मान्यता मिळाली आहे. या सर्व जागांचा समावेश तिसऱ्या फेरीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक जागा उपलब्ध होणार असून तिसऱ्या फेरीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
या राज्यांमध्ये जागांमध्ये वाढ
आंध्र प्रदेश २५०, छत्तीसगड १००, गुजरात २५ , हरियाणा ३००, हिमाचल प्रदेश ५०, कर्नाटक ३५०, मध्य प्रदेश ५०, महाराष्ट्र १५०, ओडिशा १००, राजस्थान ३००, तामिळनाडू ३००, तेलंगणा १५०, उत्तरप्रदेश २५०, उत्तराखंड १००, पश्चिम बंगाल १७५
एम्स रुग्णालयांमध्ये १०० जागा वाढल्या
राज्यातील विविध महाविद्यालयामध्ये जागा वाढल्या आहेत. यामध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील दोन एम्स रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५० जागा वाढल्या आहेत.
देशात सहा नवीन महाविद्यालये सुरू
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा वाढविण्याबरोबरच सहा नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामध्ये राजस्थानमध्ये दोन महाविद्यालयांचा समावेश असून, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे.