मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २०० मीटर लांबीच्या स्टील पुलाचा दुसरा १०० मीटरचा टप्पा गुजरातमधील नाडियादजवळील राष्ट्रीय महामार्ग ४८ (एनएच-४८) वर यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. गुजरातमध्ये नियोजित १७ स्टील पुलांपैकी हा प्रकल्पासाठी पूर्ण झालेला नववा स्टील पूल आहे.
दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला जोडणारा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग ४८ हा सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. पुलाचा दुसरा टप्पा महामार्गावर तीन पदर ओलांडून एका टोकापासून १०० मीटर सरकवून उभारण्यात आला आहे. पहिला १०० मीटरचा स्पॅन एप्रिल २०२५ मध्ये उभारण्यात आला होता. व्यस्त महामार्गावर सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहनचालकांना कमीतकमी त्रास होण्याच्या उद्देशाने स्पॅन उभारण्याचे काम नियोजित वेळापत्रकानुसार केले गेले होते, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एनएचएसआरसीएल) देण्यात आली.
प्रत्येक १०० मीटरच्या दोन स्पॅननी बनलेला हा स्टील पूल सुमारे २,८८४ मेट्रिक टन वजनाचा आहे. १४.६ मीटर उंच आणि १४.३ मीटर रुंद हा पूल आहे. उत्तर प्रदेशातील हापूरजवळील सालासर कारखान्यात तयार केलेला हा स्टील पूल १०० वर्षांचा आयुष्यकाल लक्षात घेऊन तयार केला आहे. संपूर्ण ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात नियोजित २८ स्टील पुलांपैकी १७ पूल गुजरातमध्ये आणि ११ पूल महाराष्ट्रात आहेत.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमीचा प्रकल्प असून या प्रकल्पाची ११ टप्प्यात विभागणी केली आहे. यामध्ये ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाईल. राज्यात शीळफाटा ते गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १३५ किमीचे काम करण्यात येत आहे. राज्यात ठाणे, विरार, बोईसर तीन स्थानकांच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. पायाभरणी सुरू होणारे बोईसर स्थानक हे पहिले स्थानक आहे.
मेक इन इंडियाच्या धर्तीवर हा स्टील पूल उभा केला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात स्टीलच्या पुलाची उभारणी केली जात असल्याने, देशातील स्टील उद्योगाला चालना मिळत असल्याचे मत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.