मुंबई : चार वर्षांपूर्वी पुण्याजवळ झालेल्या अपघातात उजवा पाय गमवावा लागलेल्या नालासोपारास्थित ३४ वर्षांच्या व्यक्तीला व्याजासह एक कोटी रुपयांची भरपाई देण्य़ाचे आदेश मोटर अपघात दावे न्यायाधिकरणाने नुकतेच दिले.
बसचे मालक, आर. एन. कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांनी भरपाईची ही रक्कम संयुक्तपणे अभिजीत पुजारे यांना द्यावी, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले. पुजारे हे अपघाताच्या वेळी दिल्लीतील एका शिपिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते मासिक २५ हजार रुपये कमावत होते.
मात्र बस चालकाने बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झाला आणि अपघातात पुजारे यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे, हे दाव्यासह सादर केलेल्या पुराव्यांतून स्पष्ट होत आहे, असे न्यायाधिकरणाने पुजारे यांना नुकसान भरपाई मंजूर करताना नमूद केले.
पुजारे यांना अपघातामुळे आलेल्या अपंगत्त्वाचे स्वरूप लक्षात घेता भविष्यात तो निश्चितच व्यवस्थापक म्हणून काम करू शकत नाही. त्यामुळे, त्यांचे कार्यात्मक अपंगत्व हे १०० टक्के मानावे लागेल, असेही न्यायाधिकरणाने भरपाईचे आदेश देताना स्पष्ट केले. जानेवारी २०२१ मध्ये पुजारे यांच्या बसला सोलापूर महामार्गावर अपघात झाला आणि त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले. अपघातात जखमी झाल्यानंतर वर्षभराने, फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने न्यायाधिकरणाकडे दावा दाखल करून १.२५ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती.
काय घ़़डले ?
पुजारे हे घटनेच्या दिवशी पहाटे साडेपाचच्या सुमारास टाटा मोटर्सच्या बसने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याजवळून सोलापूर महामार्गाच्या दिशेने जात होते. बसचा चालक भरधाव, बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. परिणामी, त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला उलटली.
शरीराला अन्यत्रही गंभीर दुखापत
या अपघातात पुजारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली कापवा लागला. त्याच्या दोन्ही हातांना देखील दुखापत झाली. तसेच, डाव्या पायाचा गुडघ्यालाही इजा झाली होती. घोट्यालाही अनेक बाह्य जखमा झाल्या. पुजारे यांच्या डोक्यालाही विशेषकरून कपाळाला जखम झाली. त्याला या अपघातामुळे वरचा एक दात गमावला आणि अन्य़ तीन दातांचेही नुकसान झाले.