मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या विविध क्रीडा स्पर्धा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि संगणीकृत होण्याच्या उद्देशाने ‘ऑनलाइन पोर्टल फॉर स्पोर्ट्स इव्हेंट ॲडमिनिस्ट्रेशन’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ऑनलाईन यंत्रणेमुळे विद्यापीठामार्फत आयोजित होत असलेल्या ३७ क्रीडा प्रकारातील ११७ स्पर्धांचे ऑनलाईन व्यवस्थापन सुलभ होणार आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विभागीय, आंतरविभागीय, आंतरमहाविद्यालयीन, क्रीडा महोत्सव, पश्चिम विभागीय, अखिल भारतीय आणि जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये विविध ९१५ संलग्नित महाविद्यालयातील सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. या सर्व क्रीडा स्पर्धांसाठी नोंदणी, दस्तऐवज, पात्रता आणि अनुषंगिक बाबींची नोंद ठेवणे जिकरीचे होत होते. त्यामुळे विद्यापीठामार्फत नव्याने कार्यान्वित केलेल्या या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांची माहिती नोंद करण्यापासून प्रमाणपत्र तयार करण्यापर्यंतची सर्व कामे डिजिटल स्वरुपात केली जातील. तसेच या यंत्रणेद्वारे सर्व खेळाडूंचे, तसेच निवड समितीचे सर्व तपशील विद्यापीठाकडे ऑनलाईन उपलब्ध होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे प्रवास व दैनंदिन भत्ता आणि महाविद्यालयांना दिले जाणारे क्रीडा अनुदान या सर्व कामकाजामध्ये सुसूत्रता येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला त्याच्या सहभागबद्दलचे प्रमाणपत्र व मेरिट प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रसाद कारंडे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.