मुंबई : साताऱ्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची सखाेल व निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

तरुण डॉक्टरांची ग्रामीण भागामध्ये नियुक्ती करून सरकार ग्रामीण भागतील आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा मानसिक व शारीरिक छळ होत असून भविष्यात तरुण डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्यास तयार होणार नाहीत. या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या महिला डॉक्टरने मानसिक व शारीरिक छळाबाबत वारंवार वरिष्ठांशी संपर्क साधून मदत मागितली होती.

तसेच याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉक्टरच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबन करून अटक करावी, त्यानंतर त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीची न्यायालयीन देखरेख, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करावी. छळाबाबत वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची ओळख पटवून योग्य शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘आयएमए’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

‘मार्ड’चा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

या डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘केंद्रीय मार्ड’ आणि मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर व कूपर रुग्णालयातील ‘बीएमसी मार्ड’ने तीव्र निषेध केला आहे. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांनी शनिवारी हातावर काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध केला.

त्याचप्रमाणे या महिला डॉक्टरने आत्महत्येबाबत लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाव असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करा. तसेच या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही ‘मार्ड’ने केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई केली नाही, तर ‘केंद्रीय मार्ड’ राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

फाईमाकडून तातडीने कारवाईची मागणी

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फाईमा) या घटनेचा निषेध करत या प्रकरणाचा तपास वेगाने व निष्पक्षपणे करण्याची मागणी केली आहे. तसेच महिला डॉक्टरच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.