मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत, रेल्वे स्थानकांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील १,३०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यापैकी भारतीय रेल्वेवरील १०३ रेल्वे पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२३ आणि २६ फेब्रुवारी २०२४ या दोन टप्प्यात या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. भारतीय रेल्वेमधील १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे २२ मे २०२५ रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. तर, एकट्या महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत १३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी १५ स्थानकांचे उद्घाटन २२ मे रोजी करण्यात येणार आहे. या स्थानकांमध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर, देवळाली, धुळे, सावदा, चांदा, एनएससीबी इतवारी, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेअंतर्गत येणाऱ्या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम केवळ १५ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाले. मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या ८० स्थानकांमध्ये १२ प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत. ही स्थानके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी-अनुकूल सुविधांनी विकसित करण्यात आली आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अमृत भारत रेल्वे स्थानके

चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी केली होती. त्यानंतर या स्थानकावरील फलाटाचे काम, सीमा भिंत उभी करून तिचे सौंदर्यीकरण करणे, पादचारी पुलाच्या जिन्यांची सुधारणा, सुरक्षा भिंतीवर थ्रीडी चित्रे काढण्यात आली. यासह येथे अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या स्थानकातून दररोज सरासरी ३६,६९६ प्रवासी प्रवास करतात. चिंचपोकळी स्थानकाची सुधारणा करण्यासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

परळ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ६ ऑगस्ट २०२३ रोजी पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पाचा खर्च १९.४१ कोटी रुपये आहे. परळ स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत, वाहनतळासाठी जागा, बगीच्यांची कामे, स्थानक व्यवस्थापक कार्यालय आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या सरासरी प्रतिदिन ४७,७३८ प्रवाशांना मोठा फायदा होईल.

वडाळा रोड स्थानकाची पुनर्विकासाची पायाभरणी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली होती. या प्रकल्पाचा खर्च २३.०२ कोटी रुपये आहे. प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि स्थानकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी वडाळा रोड स्थानकाचे अद्यावतीकरण करण्यात आले. या स्थानकातून दररोज सरासरी १ लाख ३२ हजार ६८० प्रवासी प्रवास करतात.

माटुंगा स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पाचा खर्च १७.२ कोटी रुपये आहे. माटुंगा स्थानक हे भारतातील पहिले महिला अधिकारी आणि कर्मचारी संचालित स्थानक आहे. माटुंगा स्थानकात प्रवासी सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. छताचे काम, शौचालय, फलाटाचे काम करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा भिंतीवर थ्रीडी चित्र रेखाटण्यात आली आहेत. माटुंगा स्थानकातून दररोज सरासरी ३७,९२७ प्रवासी प्रवास करतात.

शहाड स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पाचा खर्च ८.३९ कोटी रुपये आहे. शहाड स्थानकात वाहनतळ उभारण्यात आले आहे. आकर्षक विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन शौचालयही बांधण्यात आले आहे.