मुंबई : राजकारण्यांनी पोलिसांना दमबाजी करणे, ही पद्धतच सध्या रुढ झाली आहे. तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्र्यांचे धमकीवजा संभाषण मुद्रित करण्याची हुशारी तरी दाखवली. अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. केवळ हेच उपमुख्यमंत्री नव्हे तर अन्य उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी पोलीस, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये. कायदे तुम्हीच तयार केले आहेत आणि त्या कायद्यांचे पालन करु नका, असे तुम्हीच सांगत आहात. कायदे चांगले आहेत. फक्त अंमलबजावणी प्रभावी हवी, असे मत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या ‘ब्रह्मास्त्र अनलिशड’ या मुंबईतील संघटित गुन्हेगारी व पोलिसांच्या प्रभावी कारवाईची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन रिबेरो यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. यावेळी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त महेश नारायण सिंग, सतीश साहनी तसेच गुप्तचर विभागाचे माजी वरिष्ठ अधिकारी व्ही. बालचंद्रन हेही यावेळी उपस्थित होते. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते.

आपण ठाणे पोलीस आयुक्त असताना आपण दारुअड्ड्यांविरुद्ध जोरदार मोहिम राबविली होती. त्यावेळी एक आमदार आपल्याला भेटायला आले आणि कारवाई थांबविण्यास सांगितली. त्यावेळी मी त्यांना विचारले की, तुम्ही कायद्यात बदल करीत आहात का? कायद्यात बदल केला तरच मी कारवाई थांबवू शकतो. परंतु कायद्यात तरतूद असेल तर मला काहीही करता येणार नाही. तुम्ही तसे मुख्यमंत्र्यांनाही सांगा, असा निरोप दिला. परंतु त्यानंतर मला कोणाचाही फोन आला नाही, अशी आठवणही रिबेरो यांनी सांगितली.

शिवानंदन हे त्यावेळी गुप्तचर विभागातून मुंबईत बदलून आले होते. त्यावेळी ते थेट आपल्या घरी आले आणि एके ५६ रायफली जुहू तारा रोड येथील एका नाल्यात लपविण्यात आल्याची पक्की खबर असल्याचे सांगू लागले. आम्ही थेट तेथे गेलो आणि मोठा शस्त्रसाठा सापडला. शिवानंदन हे धडाधडीचे अधिकारी असून आपल्यावर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा शिवानंदन यांची बदली करण्याचा घाट घातला जात होता. परंतु आपण तो उधळून लावला, अशी आठवण माजी पोलीस आयुक्त महेश नारायण सिंग यांनी सांगितली. आपले हे पुस्तक म्हणजे मुंबई पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात फत्ते केलेल्या मोहिमेचे वर्णन आहे. अनेक अधिकाऱ्यांमुळेच हे शक्य होऊ शकले, असे शिवानंदन यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले.