मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणूकीत यंदा राजकारण रंगणार आहे. आधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत एक पॅनल तयार केलेले असताना आता ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी महायुतीनेही मोर्चेबांधणी केली आहे. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंत्री नितेश राणे आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी एकत्र येऊन एक पॅनल तयार केले आहे. त्यामुळे यंदा ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्व पातळ्यांवर या राजकारणातील युती आणि आघाड्यांना सुरुवात झाली आहे. त्याचाच प्रत्यय बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीतही येऊ लागला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणूकीला महत्व आहे. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. बेस्टचे बहुतांश कामगार,पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. कित्येक कर्मचारी हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असून दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणूकीसाठी उतरवण्यात आले आहे.

ठाकरे बंधूंच्या पॅनेलची घोषणा झाल्यानंतर महायुतीनेही आपले दंड थोपटले आहेत. आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेना(शिंदे) पक्षाचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनलची निर्मिती केली असल्याची माहिती समर्थ बेस्ट कामगार सेनेचे विलास पवार यांनी दिली.

पाच संघटना एकत्र

महायुतीमधील या नेत्यांच्या तीन संघटनांना बेस्टमधील आणखी दोन संघटनांनी साथ दिली आहे. त्यात महेंद्र साळवे यांची बेस्ट एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन व दिवंगत मनोज संसारे यांचा बहुजन संघ अशा दोन संघटनांचाही महायुतीच्या पॅनेलमध्ये समावेश आहे.

८४ वर्षांचा इतिहास

सुमारे ८४ वर्षांचा इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संचालक मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होते. या काळात या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांनी सोसायटीचे राजीनामे दिले. परिणामी यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या सभासदांची संख्या निम्म्यावर आली. “अ” श्रेणी मध्ये असलेली सोसायटीची श्रेणी घसरुन गेली ४ वर्षे “ब” श्रेणीमध्ये आलेली आहे असा आरोप पवार यांनी केला आहे.