मोहम्मद थावर, एक्स्प्रेस
मुंबई : ‘पवई येथील तीन तासांच्या ओलीसनाट्यादरम्यान रोहित आर्या याने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसरकर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला.
तसेच आर्या याला शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले’, असे एका भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. दरम्यान, हे प्रकरण इतके गंभीर होईल याची कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे.
आर्थिक व्यवहाराशी संबंधित मागण्यांसाठी १७ अल्पवयीन मुलांसह १९ जणांना रोहित आर्या याने ३० ऑक्टोबर रोजी पवईतील स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. रोहित याने शिक्षण विभागात केलेल्या कामाच्या थकबाकीसाठी हे कृत्य केल्याचा दावा केला होता. ओलीसनाट्यावेळी आर्याने पोलिसांना सांगितले की, शालेय शिक्षण विभागासाठी राबवलेल्या प्रकल्पाची थकीत रक्कम मिळाली नसल्याने मी नाराज आहे. याप्रकरणात ज्या व्यक्तीला प्रश्न विचारू इच्छितो, ते केसरकर होते आणि त्यानुसार एका ‘डीसीपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याने केसरकर यांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तथापि, त्यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला,’ असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, केसरकर यांना याबाबत विचारणा केली असता, आर्याने थकबाकीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले पाहिजे, असे सांगून मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. मला कल्पना नव्हती, की हे प्रकरण इतके गंभीर होईल, असे केसरकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
