वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या स्तरावर महाविकासआघाडीत आणि देशाच्या पातळीवर ‘इंडिया’ आघाडीत सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले. अशातच शनिवारी (२१ ऑक्टोबर) शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकासआघाडी किंवा इंडियात सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. देशातील आगामी ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडले, असं मला वाटत नाही.”

यशवंत चव्हाण सेंटर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या पुस्तकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना बोलावण्यात आले होते. यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होता. या कार्यक्रमानंतरच दोघांचीही भेट झाली.

“काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन भटजी आमचं लग्न होऊ देत नाही”

दरम्यान, याआधी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे.”

हेही वाचा : “ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

वंचितच्या समावेशावर शरद पवार काय म्हणाले होते?

शरद पवार म्हणाले होते, “उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगतो. आमचं धोरण असं आहे की, भाजपाच्याविरोधात जेवढ्या शक्ती एकत्र येऊ शकत असतील त्यांना किमान समान कार्यक्रमावर एकत्र आणलं जाईल. याआधी काय झालं आहे याचा विचार न करता त्या सर्वांना सहभागी करून घ्यायला हवं.”

“वंचित बहुजन आघाडीलाही इंडिया आघाडीत सहभागी करावं”

“वंचित बहुजन आघाडीलाही इंडिया आघाडीत सहभागी करावं, असं आम्हा लोकांचं मत आहे. मात्र, हा निर्णय एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊ शकणार नाही. बाकीच्या लोकांनाही विश्वासात घ्यावं लागेल,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar comment on meeting with sharad pawar in mumbai pbs