वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना-वंचितच्या युतीबाबत एक सूचक वक्तव्य केलं. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. “वंचित बहुजन आघाडीचा शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर साखरपुडा झाला आहे, मात्र, लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा आहे,” असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. ते रविवारी (१ ऑक्टोबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली. आता लग्नाची तारीख ठरली पाहिजे. मात्र, दोन भटजींमुळे लग्नाची तारीख ठरवलेली नाही. एक काँग्रेसचा नावाचा भटजी आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा भटजी आहे. हे दोन भटजी जोपर्यंत लग्नाची तारीख ठरवत नाही, तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही. त्यामुळे आम्ही काय करणार.”
“आता काँग्रेसकडून सीपीआयचा (एम) प्रवक्ता म्हणून वापर”
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर सीपीआयचा (एम) प्रवक्ता म्हणून वापर करत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकरांचे नाव सुचवल्यावर काय झाले होते? काँग्रेसचा प्रतिसाद काय होता ते आता सीताराम येचुरींनी देशाला सांगावे.”
“वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय यूपीएला मिळू शकले असते”
“बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होती. दलित विरुद्ध दलित का? व कशासाठी? त्याऐवजी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आदिवासी उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी द्यावा, हा ॲड प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव होता. एका वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय यूपीएला मिळू शकले असते,” असं वंचितने म्हटलं.
“आम्ही तेच ते प्रश्न ऐकून आणि त्याची उत्तरे देऊन कंटाळलो आहोत”
वंचितने सीताराम येचुरी यांना उद्देशून म्हटलं, “प्रिय सीताराम येचुरी आम्ही तेच ते प्रश्न ऐकून आणि त्याची उत्तरे देऊन कंटाळलो आहोत. हे प्रश्न प्रकाश आंबेडकरांना पुन्हा पुन्हा विचारण्यापेक्षा आता आपण इंडिया आघाडीला हे विचारणे गरजेचे आहे की, कधीपर्यंत दलितांचे मसिहा बनण्याचे ढोंग रचणार आहात?”
हेही वाचा : प्रकाश आंबेडकर ‘इंडिया’त येण्यास तयार आहेत का? सीताराम येचुरी यांचा प्रश्न
“दलितांचे राजकारण आपल्या वर्चस्वाखाली ठेवणार? दलितांना सत्तेत बरोबरीने वाटा देण्याची त्यांची खरोखर तयारी आहे का?” असा सवालही वंचितने विचारला.