मुंबई : त्वचेवरील लालसर, खरखरीत चट्टे आणि सततचा खाज-यामुळे ओळखला जाणारा सोरायसिस हा आजार भारतात वेगाने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. भारतीय त्वचारोग सोसायटी आणि इंडियन जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात सोरायसिसचे प्रचलन सुमारे ०.४ टक्के ते २.८ टक्के दरम्यान आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी शहरी भागात, विशेषतः प्रदूषण, मानसिक ताण आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हा आजार जास्त प्रमाणात दिसतो.
सोरायसिस हा एक ऑटोइम्यून दाहजन्य त्वचारोग असून तो दीर्घकाल टिकणारा आहे. तो केवळ त्वचेवर मर्यादित राहत नाही, तर काही रुग्णांमध्ये सोरियाटिक आर्थ्रायटिस या सांध्यांच्या आजाराचे रूप घेऊ शकतो. इंडियन जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजी (२०२३) च्या आकडेवारीनुसार, सोरायसिस असलेल्या सुमारे २० टक्के ते ३० टक्के रुग्णांमध्ये सांधेदुखीची लक्षणे दिसतात, जी उपचार न झाल्यास कायमस्वरूपी विकृती निर्माण करू शकतात.
भारतामध्ये सोरायसिसवरील राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण सर्वेक्षण अद्याप मर्यादित असल्यामुळे नेमकी राज्यनिहाय आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, एम्स, दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगढच्या रुग्णालयीन अभ्यासानुसार उत्तर भारतात हा आजार सुमारे २.३ टक्के प्रौढांमध्ये आढळतो, तर दक्षिण भारतात हा दर ०.४ टक्के ते १.५ टक्के इतका आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील फरक, आहार पद्धती, आनुवंशिक घटक आणि पर्यावरणीय परिस्थिती यामुळे प्रचलनात भौगोलिक फरक दिसतो.
शहरी भागात मानसिक ताण, झोपेचा अभाव, प्रदूषण, मद्यपान, धूम्रपान आणि असंतुलित आहार हे घटक सोरायसिसच्या लक्षणांना बळकटी देतात.
२०२२ मध्ये आयएडीव्हीएलच्या त्वचारोग तज्ज्ञांच्या सर्वेक्षणात ६५ टक्के डॉक्टरांनी कोविड-१९ महामारीच्या काळात सोरायसिस रुग्णांमध्ये लक्षणे वाढल्याचे नमूद केले. सरकारी रुग्णालयांमध्ये मेथोट्रेक्सेट, सायक्लोस्पोरिनसारखी औषधे तुलनेने कमी किमतीत उपलब्ध असली तरी, बायोलॉजिकल थेरपी सारखे प्रगत उपचार अजूनही महागडे आहेत. एका बायोलॉजिकल औषधाचा मासिक खर्च २५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, जे बहुतेक रुग्णांसाठी परवडणारे नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोरायसिसला केवळ सौंदर्यदृष्ट्या त्रासदायक आजार मानून चालणार नाही, तर त्याला हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्व आणि मानसिक नैराश्याशी जोडलेला गंभीर आजार म्हणून ओळखायला हवे.
तज्ज्ञांचे मत एम्स दिल्लीस्या त्वचारोग विभागातील डॉक्टरांच्या मते, भारतामध्ये सोरायसिसवरील जनजागृती अजूनही कमी आहे. रुग्ण लक्षणांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि उशिरा उपचार घेतात. लवकर निदान आणि सततचा उपचार हा सांध्यांवरील आणि इतर अवयवांवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.आ रोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) अंतर्गत त्वचारोगांच्या नोंदीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे सोरायसिससारख्या दीर्घकालीन आजारांची अचूक आकडेवारी मिळवणे आणि धोरण आखणे सोपे होईल.
सोरायसिसवर मात करण्यासाठी केवळ औषधोपचार नव्हे, तर जीवनशैलीतील बदल, मानसिक आरोग्याची काळजी, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि तणाव नियोजन महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे एकमत आहे. भारतातील वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा आजार सार्वजनिक आरोग्याच्या अजेंड्यावर प्राधान्याने असणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.