मुंबई : सध्या प्रवाशांना त्यांची तिकीटे आरक्षित झाल्याबाबतचा संदेश रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी चार तास आधी येतो. रात्री किंवा पहाटेच्या रेल्वेगाडीच्या तिकीट आरक्षणाची माहिती बऱ्याच उशिराने समजते. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत होत्या. तसेच तिकीट आरक्षित न झाल्यास, पर्यायी व्यवस्था करणे त्वरित शक्य होत नाही. त्यामुळे आता रेल्वेगाडी सुटण्याच्या किमान आठ तास आधी पहिली आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात प्रवाशांना आरक्षित तिकिटांची माहिती किंवा आरक्षित न झालेल्या तिकीटाची माहिती चार तासांऐवजी आठ तास आधी कळवण्यात येणार आहे.
रेल्वे मंडळाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, पश्चिम रेल्वेचे आरक्षण यादी तयार करण्याचे वेळापत्रक १४ जुलै रोजीपासून लागू होईल. सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, डबा आणि आसनाची माहिती असलेली आरक्षण यादी तयार केली जाते. मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून रेल्वेगाडी सुटण्याच्या चार तास आधी यादी प्रसिद्ध करण्यात येते. परंतु, रेल्वे मंडळाच्या निर्देशांनुसार, १४ जुलै २०२५ पासून, रेल्वेगाडीची पहिली आरक्षण यादी ती सुटण्यापूर्वी आठ तास आधी तयार करण्यात येणार आहे.
सुधारित आरक्षण यादीत वेळा पुढीलप्रमाणे
– पहाटे ५.०१ ते दुपारी २ पर्यंत सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची पहिली आरक्षण यादी ती सुटण्यापूर्वीच्या आधीच्या दिवशी रात्री ९ वाजता तयार केली जाईल.
– दुपारी २.०१ ते ४ वाजेदरम्यान सुटणाऱ्या रेल्वेगाडीची पहिली आरक्षण यादी, त्याच दिवशी सकाळी ७.३० पर्यंत तयार केली जाईल.
– दुपारी ४.०१ ते रात्री ११.५९ दरम्यान आणि रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची पहिली आरक्षण यादी नियोजित वेळेच्या आठ तास आधी तयार करण्यात येईल. – दुसऱ्या आरक्षण यादीसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही. ती सध्याच्या तरतुदींनुसार असेल.