मुंबई: दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचले आहे. कुर्ल्या येथील नेहरूनगर पोलीस ठाणेही सोमवारी रात्रीपासून जलमय झाले असून पोलीस कर्मचाऱ्यांवर पावसाच्या पाण्यात उभे राहून काम करण्याची वेळ आली आहे.

पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, सोमवारी पहाटेपासून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचायला सुरुवात झाली. कुर्ला नेहरूनगर येथील नेहरनगर पोलीस ठाणेही जलमय झाले होते. मात्र दुपारनंतर पोलीस ठाण्यातील पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पोलीस ठाण्याच्या आवारात दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात पाणी शिरले.

पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल, रेल्वे स्थानक परिसर आणि एव्हरार्ड नगर परिसरात मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर चेंबूरमधील टेभी पूल, शेल कॉलनी, टिळक नगर, चेंबूर कॉलनी, कुर्ल्यातील रेल्वे कॉलनी वसाहत, नेहरू नगर, कल्पना सिनेमा परिसर, बैल बाजार, कुर्ला पश्चिम या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मानखुर्दमधील रेल्वे स्थानक परिसर, साठे नगर, लल्लूभाई कम्पाउंड आणि गोवंडीतील गौतम नगर, पशुवधगृह या परिसराला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशीच परिस्थिती घाटकोपरमधील जागृतीनगर मेट्रो स्थानक, पंतनगर परिसरात आहे. तर विक्रोळी कन्नमवार नगर, विक्रोळी पोलीस ठाणे, विकास महाविद्यालय हा परिसरही जलमय झाला होता.