पोलिस भरतीच्या वेळी पाच किमी अंतर धावायला लावल्याने काही उमेदवार मृत्यूमुखी व आजारी पडल्याच्या मुद्दय़ावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले असून त्यांनी किमान १०० मीटर तरी धावून दाखवावे, असा टोला लगावला आहे. सध्याची यंत्रणा व कायदे बदलल्याखेरीज परिवर्तन घडविणे अशक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधिमंडळातील भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर टीका करताना ही पोलिस भरती जिल्हास्तरावर का घेतली जात नाही, राज्यभरातील उमेदवारांना मुंबईत का बोलावले जाते, असे सवाल केले. त्यांच्या पोटात अन्नपाणी नसताना ऊन्हात धावायला लावणे अयोग्य असून त्यांचा विचार का केला जात नाही, ऑनलाईन पध्दतीने ही प्रक्रिया का राबविली जात नाही, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
मी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यावर मतदारसंघ कोणता असा प्रश्न विचारला जातो, याचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, राज्यातील कोणताही मतदारसंघ माझा नाही. केवळ मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्र माझा, या भूमिकेतून काम केल्याशिवाय राज्यात परिवर्तन येणार नाही. मला आमदार होण्यात रस नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे जुने कायदे बदलून नवीन सुधारणा केल्या आणि काटेकोर अंमलबजावणी केली, त्याचबरोबर यंत्रणेतही बदल केले, तरच राज्य बदलू शकेल, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यावर मतदारसंघ कोणता असा प्रश्न विचारला जातो,. केवळ मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्र माझा, या भूमिकेतून काम केल्याशिवाय राज्यात परिवर्तन येणार नाही.
-राज ठाकरे, मनसे ,प्रमुख

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray target rr patil over his fitness