मुंबई : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता आणि सुधार या दोन विभागांमध्ये काही अधिकारी, कर्मचारी गेल्या सुमारे १० ते १२ वर्षांपासून कर्तव्यावर असून पालिकेच्या मालकीच्या चाळींच्या पुनर्विकासात हे कर्मचारी विकासकाला मदत करीत असल्याचा आरोप या चाळीतील रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून त्यांची बदली करावी, अशी मागणी रहिवाशांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये अनेक वर्षांपासून भाडेकरू राहत आहेत. त्यात मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळींचा समावेश आहे. या इमारतींमधील रहिवाशांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मालमत्ता आणि सुधार या विभागांतील काही अधिकारी विकासकाला मदत करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. काही सेवानिवृत्त अधिकारी आणि या विभागात वर्षानुवर्षे असलेले अधिकारी ठराविक विकासकाला मदत करीत असल्याचा आरोप या रहिवाशांनी केला. महापालिका मुख्यालयात १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या जन गाऱ्हाणी दिनी रहिवाशांनी ही तक्रार केली.
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या इमारती जुन्या असून या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात ठराविक अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करून महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्यासह मुंबई सेंट्रल बीआयटी, माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींतील रहिवासी उपस्थित होते.
