मुंबई :दिवसेंदिवस आत्महत्यांची सावली समाजावर अधिक गडद होत चालली आहे. मानसिक ताण, आर्थिक संकट आणि सामाजिक दबाव या त्रिसूत्रीने आत्महत्यांचे प्रमाण भयावह पातळीवर पोहोचले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दर ४० सेकंदाला जगात कुणीतरी आपले जीवन संपवत आहे. आत्महत्या ही फक्त वैयक्तिक शोकांतिका नसून समाजासाठी गंभीर आव्हान ठरली आहे. भारतात तर दररोज जवळपास ४७० जणांचा मृत्यू आत्महत्येमुळे होतो. या भीषण पार्श्वभूमीवर १० सप्टेंबरला पाळला जाणारा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ समाज खऱ्या अर्थाने जागरुक बनून आत्महत्यांची मानसिकता असणाऱ्यांना मदतीचा हात पुढे करणार का,हा कळीचा प्रश्न बनला आहे.

जीवनाची लढाई हरण्यापूर्वी कोणीतरी मदतीचा हात पुढे केला असता तर अनेक जीव वाचले असते. दुर्दैवाने त्यांची वेदनादायी हाक ऐकून मदतीला धावण्याची समाजाची मानसिकता हरवत चालल्यामुळे या आत्महत्या एक ‘मूक महामारी’ बनू लागली आहे. रोज सकाळी उठून ज्या कुटुंबाला आपल्या प्रियजनाच्या निधनाची बातमी कळते त्यांच्या घराचे जगणेच थांबते. दुर्दैवाने अशा घरांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मानसिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल चर्चा सुरू होते. मात्र जागतिक व भारतीय आकडेवारी पाहिली तर ही चर्चा केवळ औपचारिक न राहता यावर ठोस कार्यक्रम रबविण्याची गरज असल्याचे दिसून येते.जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२३ च्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात सुमारे ७ लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. म्हणजेच प्रत्येक ४० सेकंदाला एक जण आपले जीवन संपवतो. आत्महत्या ही १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींमध्ये मृत्यूचे चौथे सर्वाधिक कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटने स्पष्ट केले आहे.

भारताची परिस्थिती आणखी गंभीर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात एका वर्षात १,७०,९२४ लोकांनी आत्महत्या केली. म्हणजेच दररोज जवळपास ४६९ जणांनी स्वतःचे जीवन संपवले. आत्महत्यांचे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ३ टक्यांनी वाढले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढलेले दिसून येते. २०२३ मध्ये देशभरात १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जे मागील दहा वर्षांतील सर्वाधिक आहे. महाराष्ट्र या यादीत वरच्या क्रमांकावर असून राज्यात २२,००० पेक्षा जास्त आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शैक्षणिक ताणतणाव आणि मानसिक आजार ही प्रमुख कारणे म्हणून अधोरेखित झाली आहेत.

विशेष म्हणजे एलसीआरबीच्या अहवालात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३६ टक्के हे दैनंदिन मजुरी करणारे आणि बेरोजगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक अस्थिरता आणि सामाजिक दबाव हा आत्महत्यांचा मोठा कारणीभूत घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.आत्महत्येची संख्या कमी करण्यासाठी मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, समुपदेशन केंद्रांची उपलब्धता, शैक्षणिक व रोजगार धोरणांमध्ये सुधारणा आणि समाजातील संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत आत्महत्या दर ३३ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य आहे. मात्र त्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि समाज या तिन्ही स्तरांवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.