मुंबई: काळबादेवीतील एका रस्त्याला अनधिकृतपणे एका व्यक्तीचे नावे देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे त्याची पार्श्वभूमी गैरकृत्यांची असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील विठोबा लेन परिसरात किशोरभाई पन्नालाल सागर चौक अशी पाटी लावली आहे. मात्र ही पाटी अनधिकृतपणे लावण्यात आल्याची तक्रार शिवेसेनच्या शिंदे गटाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाकडे केली आहे. मुंबईतील कोणत्याही रस्त्याला नाव द्यायचे असले तर त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. नगरसेवकांनी पत्र दिल्यानंतर प्रशासन त्या नावाचा विचार करून त्यावर अभिप्राय देत असते. ज्याचे नाव द्यायचे आहे त्याचा पूर्वेतिहास तपासला जातो, त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक योगदान किती आहे ते तपासले जाते. त्यानंतर पालिकेच्या स्थापत्य समितीने आणि सभागृहाने त्या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच रस्त्याच्या नामकरणाची पाटी लावली जाते. मात्र विठोबा लेन येथे ही कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा… मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ३४ टक्के अतिरिक्त पोलीस; मुंबई वाहतूक पोलिसांकडे ३४ टक्के जागा रिक्त

किशोर सागर हे नाव काही गुन्हेगारी कृत्यांशी जोडले गेल्याची चर्चा या परिसरात आहे. तसेच लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत, असे आरोप तक्रारदान नाईक यांनी केले आहेत. या नामकरणाला परिसरातील काही रहिवाशांचा प्रचंड विरोध आहे तर काहींचा पाठिंबा आहे. ज्यांचे नाव आहे तेही एका राजकीय पक्षाशी संबंधित होते.

पालिकेला पत्ताच नाही

याबाबत विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबद्दल काहिच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र फलक अनधिकृत असल्यास तो तातडीने हटवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road in kalbadevi has been named after a person unofficially shiv senas shinde group has lodged a written complaint mumbai print news dvr