मुंबई – नांदेड एक्सप्रेसमधून प्रवास करताना दरोडेखोराशी झालेल्या झटापटीत मुंबईतील एका डॉक्टरने हात गमावल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. ४ जून रोजी पहाटे ३.५० च्या दरम्यान कांजूरमार्ग रेल्वेस्टेशनजवळ घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दरोडेखोर सैफ चौधरी याला अटक केली असून त्याने केरळमध्ये देखील अशाच चोऱ्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.

डॉ. योगेश देशमुख (५०) व डॉ. दीपाली देशमुख (४४) हे दोघे त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर एलटीटी-नांदेड ट्रेनने लातूरला जात होते. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून पहाटे ३.३० वाजता त्यांनी ट्रेन पकडली. देशमुख कुटुंब लातूरला एका लग्नासाठी जात होतं. दीपाली या मधल्या बर्थवर तर, त्यांचे पती योगेश हे वरच्या बर्थवर आराम करत होते. १५ मिनिटांनी ट्रेन भांडूप व कांजूरमार्ग स्थानकांच्या दरम्यान असताना एक इसम दीपाली यांच्या बर्थजवळ आला आणि त्याने दीपाली यांनी खांद्याला अडकवलेली पर्स खेचली. मात्र, दीपाली यांनी पर्स सोडली नाही.

पत्नीची पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरने हात गमावला!

चोर पर्सबरोबर दीपाली यांना फरफटत ट्रेनच्या दरवाजापर्यंत घेऊन गेला. हा गोंधळ ऐकून योगेश झोपेतून जागे झाले आणि पत्नीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, कांजुरमार्गजवळ ट्रेनचा वेग कमी झाला. त्याचवेळी चोराने पर्सला हिसका दिला अन् त्याने ट्रेनमधून उडी मारली. त्यामुळे दीपाली आणि योगेश ट्रेनमधून बाहेर कोसळले. दोघेही जखमी झाले. तसेच योगेश यांचा हात ट्रेनच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यानंतर दीपाली या योगेश यांना घेऊन रेल्वे पटरीवरून बाहेर रस्त्यावर आल्या. तिथे त्यांनी दुधाचा एक टेम्पो रोखला आणि पतीला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेल्या.

दुसऱ्या बाजूला, देशमुखांची मुलगी ट्रेनमध्ये रडत होती. दीपाली यांच्या एका सहकाऱ्याने पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलीला कल्याण स्थानकावर उतरवलं. पोलिसांनी या चोराला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी शोध घेतला, परंतु तो त्यांच्या हाती लागला नाही.

केरळमध्ये सारखीच घटना

दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी केरळमधील कोझिकोडे स्थानकावर अशाच प्राकरची चोरीची घटना घडली. ज्यामध्ये एका चोराने धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला लुटले आणि ट्रेनचा वेग कमी होताच पळून गेला. चोराबरोबर झालेल्या झटापटीत प्रवासी ट्रेनमधून पडून जखमी झाला. केरळ पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं. सैफ चौधरी असं या आरोपीचं नाव आहे.

चोर जीआरपीच्या ताब्यात

देशमुख कुटुंबाबरोबर घडलेल्या घटनेत सैफचाच हात असल्याचं उघड झाल्यानंतर केरळ पोलिसांनी त्याला मुंबई जीआरपीच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांना अद्याप दीपाली यांची पर्स मिळालेली नाही. टाइण्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सैफविरोधात २३ गुन्ह्यांची नोंद

पोलिसांनी सांगितलं की सैफ चौधरीविरोधात २३ गुन्ह्यांची नोंद आहे. महिलांकडील पर्स पळवणे, सोनसाखळी चोरण्यासारखे अनेक गुन्हे त्याच्या नावावर नोंदवण्यात आले आहेत. सैफ यापूर्वी मुंबईत भीक मागायचा. दरम्यान, सैफबरोबर झालेल्या झटापटीत योगेश देशमुख यांनी हात गमावला आहे. त्यांच्यावर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आता त्यांना कृत्रिम हात बसवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, कुर्ला जीआरपीने सैफविरोधात भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.