मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूचे वार केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनाची मागणी केली आहे. तसेच, आपण निर्दोष असून आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा हा काल्पनिक असल्याचा दावा जामिनाची मागणी करताना केला आहे. न्यायालयाने त्याच्या या अर्जाची दखल घेऊन सरकारी पक्षाला २१ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

शरीफुल सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याने आधी एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तथापि, त्याने हा अर्ज मागे घेतला आणि वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला. दंडाधिकाऱी न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिल्यानंतर शरीफुल याने आता पुन्हा एकदा सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला आहे.

या प्रकरणी करण्यात आलेली तक्रार ही कल्पनिक असल्याचा मुख्य दावा शरीफुल याने जामीन अर्जात केला आहे. याशिवाय, आपल्याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे, आपली अटक बेकायदा असल्याचा दावा देखील त्याने केला आहे. पोलिसांनी आपल्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. शिवाय, प्रकरणाचा तपासही पूर्ण झाला असून घटनेशी संबंधित सर्व पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहे. आपल्याकडून साक्षीदारांना कुठलाही धोका नाही. त्यामुळे, आपल्याला जामीन देण्यात यावा, असा दावा शरीफुल याने जामीन अर्जात केला आहे.

प्रकरण काय ?

जानेवारी महिन्यात सैफ याच्या वांद्रे येथील घरात शरीफुल चोरीच्या उद्देशाने घुसला होता. सैफ याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरीफुल याने सैफ याच्यावर चाकूने वार केले आणि तेथून पलायन केले. या हल्ल्यात सेफ गंभीर जखमी झाला आणि त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी शरीफुल याला अटक केली. तथापि, शरीफुल याला केलेली अटक चुकीची असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला होता. तसेच, सेफ वास्तव्यास असलेल्या इमारतीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांत दिसणारा आरोपी हा आपला मुलगा नसल्याचा दावा देखील शरीफुल याच्या वडिलांना केली होता. पोलिसांनी मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला देऊन शरीफुल याच्या वडिलांच्या आरोपांचे खंडन केले होते व शरीफुल हाच सैफ याच्या घरात घुसल्याचे म्हटले होते.