वसई- विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापासात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचा खेळ खल्लास झाला आहे. जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरांनी केले आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – VIDEO : विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप, बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले, विरारमध्ये तणाव

नेमकं काय घडलं विरारमध्ये?

विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये आले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिज ठाकूर यांच्यासमवेत हॉटेलमध्ये आले. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडेंकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, कुणाला कसे पैसे वाटप झाले, याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा – Video: “विनोद तावडेंनी मला २५ वेळा फोन केले आणि…”, हितेंद्र ठाकूर यांचा मोठा दावा; पैसे वाटपाच्या आरोपांमुळे खळबळ!

“भाजपावाल्यांनी सांगितलं तावडे पैसे घेऊन येत आहेत”

दरम्यान, “मला भाजपावाल्यांनी सांगितलं होतं की विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन येतायत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाही. पण इथे पाहिलं तर पैसे वाटप चालू आहे, कार्यकर्तेही आहेत. या डायऱ्यांमध्ये नोंदी दिसत आहेत”, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on vinod tawde bahujan vikas adghadi allegation spb