मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. एकाबाजूला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना तुरडे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे.

कलिना विधानसभा मतदारसंघातील मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी सोमवारी रात्री आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. ठाणे येथे पार पडलेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

राज ठाकरेंना शह ?

ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसेच्या माजी नगरसेवकाचा पक्ष प्रवेश करवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचूक वेळ साधली आहे. आतापर्यंत ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांचे दर आठ – पंधरा दिवसांनी पक्ष प्रवेश होतात. यावेळी अचानक तुरडे त्यांचे नाव आल्यामुळे हा राज ठाकरे यांना शह दिला असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्याकडे महापालिकेच्या मागील निवडणुकीत विजयी झालेला एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. मनसेतील सहा नगरसेवक ठाकरे यांच्याकडे गेले होते. त्यांच्यापैकी बहुतांशी नगरसेवक शिंदे यांच्याकडे गेले आहेत.

कोण आहेत संजय तुरडे

कलिना विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक संजय तुरडे हे मनसेशी एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक होते. २०१७ मध्ये मनसेचे केवळ सात नगरसेवक निवडून आले होते. त्यात तुरडेही होते. मात्र काही महिन्यातच ऑक्टोबर २०१७ मध्ये या सातपैकी दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मोरे असे सहा नगरसेवक फुटले व त्यांनी तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तुरडे हे एकटे मनसेशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते.

लोकांची कामे व्हावीत

माझ्या मतदारसंघातील लोक माझ्या कडे कामे घेऊन येतात. पण निधी मिळत नसल्यामुळे कामेच होत नव्हती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांची कामे होतात. त्यामुळे पुन्हा निवडणुकीला उभे राहायचे तर लोकांची विकासकामे पूर्ण केली पाहिजेत. त्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली तुरडे यांनी दिली.

हताश होऊन बाहेर पडलो

मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पण मला त्याचं काहीच फळ मिळाले नाही, मी हताश होऊन बाहेर पडलो अशी प्रतिक्रिया तुरडे यांनी व्यक्त केली आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना मोठमोठी पदे मिळाली, त्यांची प्रगती झाली, पण माझ्या अडचणी पक्षाने किंवा पक्षश्रेष्ठीनी कधीही सोडवल्या नाहीत, असेही तुरडे म्हणाले.