मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करून सायबर भामट्यांनी ‘आभासी कैद’ अर्थात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ७० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. या आरोपींचा ५८ कोटींच्या आभासी कैद प्रकरणातही सहभाग असून त्यांच्याविरोधात विविध राज्यांत ३१ गुन्हे दाखल आहेत.

फिर्यादींना २५ सप्टेंबर रोजी फोन आला होता. तीन व्यक्तींनी त्यांना दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) येथून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादींवर पीएमएलवाय प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. मी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते बोलतोय अशी बतावणी एका आरोपीने केली. या आरोपींनी फिर्यादींना घाबरवून त्यांच्याकडून ७० लाख रुपये उकळले. या आरोपींनी अन्य एका इसमाची अशाच प्रकारे फसवणूक करून ४० लाख रुपये उकळले. पहलगाम हल्ल्यातील एका अतिरेक्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत फिर्यादीचे नाव असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले आणि त्याच्याकडून ४० लाख रुपये उकळण्यात आले.

६ आरोपींना अटक

या प्रकरणात रफी अहमद मार्ग किडवाई पोलिसांनी सुरेशकुमार पटेल (५१), मुसरान कुंभार (३०), चिराग चौधरी (२९), अंकित शहा (४०) आणि वासुदेव उर्फ विवान बारोट (२७), तसेच युवराज उर्फ मार्को लक्ष्मणसिंग सिकरवार (३४) या ६ आरोपींना अटक केली. पोलिसांनी जलद तपास करून १५ खाती गोठवली आणि १० लाख रुपये वाचवले. आरोपींविरोधात १३ राज्यांत ३१ गुन्हे दाखल आहेत. याच आरोपींचा ५८ कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्यवसायात नुकसान झालेल्या व्यावसायिकाला हेरून आरोपी त्यांची बँक खाती वापरायला घ्यायचे. त्याची बॅंक खाती अद्ययावत करून फसवणुकीतील पैसा त्यात वळवत होते. युवराज उर्फ मार्को लक्ष्मण सिंग सिकरवार हा मुख्य आरोपी आहे. तो परदेशातील सायबर भामट्यांच्या संपर्कात होता. मागील तीन वर्षांपासून तो सायबर गुन्ह्यात सक्रिय असून आजवर एकदाही पकडला गेला नव्हता, असे परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सांगितले.