मुंबई : गेली सलग तीन वर्षे शिवडी परिसरात होणारा भाजपचा मराठी दांडिया यावेळी विक्रोळीत होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना या परिसरातील रहिवाशांनी नाकारल्यामुळे भाजपने यंदा शिवडीवासियांकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा या परिसरात सुरू आहे.

गेल्या काही वर्षात भाजपने मराठी मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवडीसारख्या मराठीबहुल भागात मराठी दांडियाचे आयोजन केले होते. शिवडी हा शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला असून इथे घराघरात ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने या भागात मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.

अभ्युदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया आयोजित केला होता. त्यावेळीही विजेत्यांना आयफोनसारखी महागडी बक्षीसे घोषित करण्यात आली होती. या दांडियाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र यंदा भाजपने शिवडीत मराठी दांडिया आयोजित न करता मराठी बहुल परिसर असलेल्या विक्रोळीत त्याचे आयोजन केले आहे.

भाजपच्या वतीने यंदा सलग चौथ्या वर्षी मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात हा मराठी दांडिया आयोजित केला आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘मराठी दांडिया’ होत आहे. मात्र यंदा ठिकाण बदलल्यामुळे याबाबतची चर्चा सुरू आहे.

लोकसभा व विधानसभेतही ठाकरेंचा बालेकिल्ला अढळ भाजपने शिवडी भागात जम बसवण्याचा प्रयत्न केला असला तरी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवडीतील मतदारांनी भाजपला साफ नाकारले. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार खासदार अरविंद सावंत हे ५२ हजारांहून अधिक मतांनी जिंकले. त्यांना शिवडी मतदारसंघातून १७ हजाराचे मताधिक्य मिळाले.

तर विधानसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अजय चौधरी सात हजार मतांनी जिंकले. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला सपाटून हार पत्करावी लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे (ठाकरे) अजय चौधरी यांच्यात लढत झाली होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तर इथे महायुतीचा उमेदवार जिंकून येणे कठीण आहे, हे उमगल्यामुळे भाजपने आता शिवडीतून काढता पाय घेतल्याची चर्चा या भागात सुरू आहे.

भाजपने आरोप फेटाळले याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणुकीशी याचा काही संबंध नाही. मराठी दांडिया हा मराठी वस्तीमध्ये करावा अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. तीन वर्षे शिवडीत कार्यक्रम केल्यानंतर यंदा विक्रोळी, भांडूपमधील मराठी लोकांसाठी हा दांडिया आयोजित करावा ही त्यामागची भावना आहे.

शिवडीत आम्हाला प्रचंड प्रतिसाद होता आणि विक्रोळीतही खूप प्रतिसाद आहे. खरे तर मुंबईत अनेक ठिकाणी मराठी दांडिया ठेवावे का असाही आम्ही विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरची संकल्पना

विक्रोळीतील दांडियाची ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संकल्पना आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते मराठी दांडियाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतील व बॉलीवूडमधील सुप्रसिध्द कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थित राहात आहेत. हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला मराठी दांडियासाठी निःशुल्क प्रवेश देण्यात येत आहे.

मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्यांना रोज तीन आयफोन असे एकूण पाच दिवसात १५ आयफोन पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहेत. दररोज जवळपास २५ हजार प्रेक्षक या दांडियात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या दांडियाचे यु-ट्यूब वर थेट प्रक्षेपण प्रेक्षक बघू शकतील, असेही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जाहीर केले आहे.