मुंबई: राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत. नैसर्गिक आपत्ती बाधितांसाठी पुनरुज्जीवर आराखडा तयार करावा अशी महत्वपूर्ण सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी एक्स समाजमाध्यमांच्या माध्यमातून सरकारला ही सूचना केली आहे. त्यामध्ये नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे. नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे.शेतकरी हिताचे निर्णय घेण्याबाबतच्या सूचनांचा समावेश आहे.

या अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.

आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा. वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे.

शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष देण्याची सुचनाही पवार यांनी सरकारला केली आहे.

अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात. पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे. वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ स्थगित करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे. ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राह असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.