मुंबई : कामगार, सामाजिक व शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी महायुती सरकारने ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक’ आणले असून हे विधेयक बहुमताच्या जोरावर सभागृहात मंजूर केल्यास रस्त्यावरची लढाई होईल, असा गंभीर इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करा, या मागणीसाठी ‘जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती’च्यावतीने सोमवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माकप आमदार विनोद निकोले, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, सुनील भुसारा, कॉ. भाकपचे सुभाष लांडे, कामगार नेते काशिनाथ नखाते, उल्का महाजन, मेकॅनिक डाबरे उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर जन सुरक्षा विधेयक आणत आहात. राजकीय विरोधकांना तुरुंगात पाठवण्याची स्वप्न बघताय. मग, पहलगामचे अतिरेकी गेले कुठे?. भाजपात गेले का? जे भाजपत जातील ते साधू-संत, भाजपविरोधी बोलतील ते देशद्रोही, असे चित्र आहे. सत्तेची ही मस्ती चालू देणार नाही. आणीबाणीच्या काळ्या आठवणी सांगता, पण १० वर्ष देशात अघोषित आणीबाणी आहे, त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.
‘तुम्ही लढणार असाल, तर शिवसेना तुमच्यासोबत आहे. सभागृहात त्यांच्याकडे बहुमत आहे. पण रस्त्यावर आपली सत्ता आहे. हे लोकशाही विरोधी विधेयक लागू केल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन उभे राहील. हे विधेयक आणून राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही कडवा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आवाज उठवला की घाल तुरुंगात, असे कराल तर तुम्हाला तुरुंग कमी पडतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
पक्षीय रंग न देता माणुसकी टीकवण्यासठी या विधेयकाविरोधातला लढा लढला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे म्हणाल्या. जनसुरक्षा विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकाराव गदा येणार आहे, असे शेकापचे भाई जयंत पाटील म्हणाले. सदर विधेयक लोकशाहीविरोधी असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. जनसुरक्षा कायदा हा आंदोलन करण्याच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी सांगितले.