मुंबईत सध्या सर्वच पक्षांकडून आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यातूनच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर होणार की पुढे ढकलली जाणार याचा विचार न करता महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. “जिल्हा विकास योजनेतील निधीतून केलेली कामे मार्गी लावा, त्यांचा अहवाल तयार करा आणि शहरात शिवसेनेने केलेली कामे आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा,” असा आदेश मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना दिला.

यादरम्यान शिवसेनेकडून पालिका निवडणुकीत विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा फेटाळल्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विभाग प्रमुखांना आदेश

मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या काही नगरसेवकांना डावलणार असून त्यांच्या जागी तरुणांना संधी देणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेत आता ज्येष्ठांऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आदित्य ठाकरेंनी हे वृत्त फेटाळलं आहे.

आदित्य ठाकरेंचं ट्वीट

“विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

शिवसेनेच्या विभाग प्रमुख, खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी रात्री उशिरा घेतली. परिवहनमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत आदी नेतेही या वेळी उपस्थित होते. इतर वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थिती लावत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

“सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सवलत दिली आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांत मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक कामे हाती घेतली व पूर्ण केली. शिवसेनेने मुंबईसाठी केलेले हे काम घराघरांपर्यंत पोहोचवा. निवडणूक कधी होणार याचा विचार न करता कामाला लागा,” असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. “जिल्हा विकास योजनेतून विकासकामांसाठी निधी दिला. त्यातून कोणती कामे मार्गी लावली याचा अहवाल तयार करा आणि सादर करा,” असेही ठाकरे यांनी सांगितले.

“ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशीच शिवसेनेची भूमिका आहे. त्या दृष्टीने सरकारकडून आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली जात आहे. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या हातात आहे,” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.