VIDEO: राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईकडे रवाना

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार व सहयोगी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रच गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Eknath Shinde Shivsena Rebel MLA
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईला येताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार व सहयोगी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रच गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन आमदारांसोबत प्रवास करत आहेत. बंड करून महाराष्ट्र सोडल्यानंतर ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. हे आमदार आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोव्यात आले होते.

बंडखोर आमदारांना आधी गोव्यातील ताज हॉटेलमधून ट्रॅव्हल बसने विमानतळावर नेलं जात आहे. तेथून हे आमदार विमानाने मुंबईला येतील. त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा :

नव्या सरकार स्थापनेसह आता विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक होत आहे. याशिवाय नव्या सरकारचा विश्वासमत ठरावही सादर होईल. त्यावेळी बहुमत चाचणी पार पडेल. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या सर्व बंडखोर आमदारांना आता मुंबईत आणलं जात आहे.

एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

खरंतर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष निवडणूक; भाजपाच्या राहुल नार्वेकरांविरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी रिंगणात

त्यामुळे उद्या विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena all rebel mla coming to mumbai from goa with cm eknath shinde pbs

Next Story
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याशी संबंधित प्रकरणाचा सीबीआय तपास बंद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी