मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यात स्थानिक पातळीवर नेत्यांना पक्षात घेण्याची चढाओढ सुरू आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली. त्यावर तुम्हीच आधी फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले. वाद टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी एकमेकांच्या पक्षांतील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा झाली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. शिंदे यांचे निकटवर्तीय महेश पाटील यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांना मंगळवारी पक्षात घेतल्याने वाद वाढला. राज्यात आणखी काही ठिकाणी भाजपने शिवसेनेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यातच शिवसेना मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळत नाही, प्रस्तावांना मान्यता मिळत नाही, कामे होत नसल्यानेही शिवसेना मंत्री नाराज आहेत.

मंगळवारी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यात भाजपच्या भूमिकेवर विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण-डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पातळीवरही शिवसेनेला त्रास दिला जात आहे, नेत्यांना प्रलोभने दाखवून किंवा धमकावून भाजपत घेतले जात असल्याबद्दल काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना शिवसेना मंत्री बाजूच्या दुसऱ्या सभागृहात बसून होते.

मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मनमानीबद्दल फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यावर आधी तुम्हीच फोडाफोडीची सुरुवात केली. आमच्या माजी आमदारांना फोडताना मला विचारायला आला होता का, अशी विचारणा करीत फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.

बहिष्कार नाही, शिवसेनेचा दावा

शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता; परंतु असा कोणताही बहिष्कार टाकण्यात आला नव्हता, असे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नंतर स्पष्ट केले. माझ्यासह काही मंत्र्यांना वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे सामंत म्हणाले.

महायुतीला गालबोट लागणार नाही यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. आता परस्परांच्या पक्षांतील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये, प्रत्येकाने याचे पालन करावे. आमच्या नेत्यांना तशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्रीही त्यांच्या कार्यकर्त्यांना अशाच सूचना देतील. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री