मुंबई : शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असली तरी समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी मात्र या विषयाचा आपल्या परिने निकाल लावला आहे. दिवसभर विविध संकेतस्थळावर शिवसेना कोणाची…उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची यावर लोकांची मते घेतली जात होती. त्यावर मोठ्या प्रमाणावर मतांचा पाऊस पडला असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी बुधवारी होणार होती. त्यामुळे शिवसैनिकांचे आणि सर्वच राजकीय पक्षांचे तसेच सामान्य नागरिकांचेही लक्ष या निकालाकडे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे.

बुधवारी या प्रकरणी निकाल लागेल अशी अपेक्षा असताना आता सुनावणी १२ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा आणि या निकालाकडे लक्ष लागून राहिलेल्या सगळ्यांचाच हिरमोड झाला. मात्र या सगळ्यांनी समाज माध्यमांवर शिवसेना कोणाची याचा आपल्या परीने निकाल लावून टाकला.

समाजमाध्यमांवर बऱ्याच संकेतस्थळावर शिवसेना कोणाची यावर ऑनलाईन मतदान घेण्यात आले. त्यातही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या नेत्याचे नाव घेताना कार्यकर्त्यांनी दुसऱ्या नेत्यावर तोंडसुखही घेतले आहे. दिवसभर दोन्ही बाजूने हा निकाल लावला जात होता. मात्र यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शिवसेना कोणाची हा काय प्रश्न आहे का, शिवसेना ही ठाकरे यांचीच अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहेत असेही काहींनी म्हटले आहे. काम करण्यासाठी शिंदे चांगले आहेत पण शेवटी सत्य हेच आहे की खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे, अशीही सुवर्णमध्य साधणारी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. मग शिवसेनेचे बहुसंख्य नेते जिथे तीच खरी शिवसेना आणि चिन्ह देखील त्यांचेच असाही एक युक्तीवाद यात बघायला मिळाला. धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना दिला तर असे होईल की शिवसेना हा कुटुंबाचा व्यवसाय आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला तर असे म्हणता येईल की शिवसेना हा सार्वजनिक पक्ष आहे अशी विचार करायला लावणारी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

शिवसेना … शिवसैनिकांची

शिवसेना कोणाची या प्रश्नाला एका व्यक्तीने शिवसेना शिवसैनिकांची असेही वेगळे उत्तर दिले आहे. एकाला धनुष्य द्या एकाला बाण द्या असाही तोडगा एका व्यक्तीने सुचवला आहे.