मुंबई: राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि अन्य अस्थापना २४ तास उघडी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उद्योग विभागाने याविषयीचा शासन निर्णय जारी केला असून यातून मद्यपानगृे, बार, परमिटरूम, हुक्का पार्लर, देशी बारना वगळण्यात आले आहे.
राज्यातील विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरांतील दुकाने, हॉटेल्स रात्रीच्या वेळीही सुरू राहावेत यासाठी मागणी करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाईट लाइफची संकल्पना मांडत तशी परवानगी देण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील भाजपकडून याला विरोध करण्यात आला होता व टीकाही करण्यात आली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारकडून राज्यभरातील दुकाने, अस्थापना, सिनेमागृहे, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
उद्योग विभागाच्या परिपत्रकानुसार, आठवड्यातील सर्व दिवस आस्थापने सुरू ठेवता येणार आहेत. मद्याची दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये गल्लत होत असल्याने पोलिसांकडून इतर दुकानेही रात्रीची खुली ठेवण्यास प्रतिबंध केला जात होता. त्यामुळे अधिक स्पष्टता आणण्यासाठी हे नव्याने हे परिपत्रक उद्योग विभागाने प्रसिद्ध केले आहे. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थपना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनिय २०१७च्या कलम२(२)मध्ये दिवस याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल, अशी तरतूद आहे.