मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या ‘जोडे मारो’ आंदोलनावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाल्याने कामकात तीन वेळा तहकूब झाले. विधिमंडळाच्या आवारात वांरवार अशा घटना घडत असून त्याला पायबंद घालताना आमदारांसाठी आचारसंहिता आणि आंदोलनाबाबतची मार्गदर्शक सूचना लागू करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी केली. तर, विधिमंडळाच्या आवार आणि सभागृहातही बोलताना सगळय़ांनीच तारतम्य बाळगायला हवे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करीत ‘जोडो मारो’ आंदोलनात सहभागी झालेल्या तालिका सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी केलेली कृती अशोभनीय आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या अपमानाबाबत सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने भूमिका घेतली जात आहे. त्याबाबत आपण कारवाईचे आश्वासन दिले असून सबंधित सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी. नाहीतर काल त्यांनी जे केले ते उद्या आमच्याकडूनही घडेल असा इशारा पटोले यांनी दिला. त्यावर भाजपचे आशीष शेलार यांनी आक्षेप घेत कालच्या घटनेचे कोणी समर्थन केलेले नाही. अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र याच आवारात गेले आठ महिने मुख्यमंत्री व अन्य सदस्यांबद्दल खोके आणि बोके असे म्हणत तुम्ही त्यांचा अपमान कसा करता, अशी विचारणा केली.

 सबंधित घटनेबाबत सुरक्षा यंत्रणेकडून अहवाल मागवला असून त्याबात कारवाई करण्याचा पुनरुच्चार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. मात्र त्यावेळी काँग्रेस सदस्यांनी मोदी सरकारविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि सत्ताधारी सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब झाले. विधिमंडळ आवारात घडलेली घटना अत्यंत चुकीची होती. तसेच सभागृहात झालेली वक्तव्येही चुकीची होती. याबाबत उद्या आपण निर्णय देणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तसेच विधिमंडळाच्या आवारात वांरवार अशा घटना घडत असून राष्ट्रीय नेत्यांचा अवमान होऊ नये आणि आंदोलनादरम्यान सदस्यांची वर्तणूक कशी असावी याबाबत आचारसंहिता लागू करण्यात येणार असून त्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी सदस्यांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

तारतम्य बाळगावे- मुख्यमंत्री

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून  देशाचा अपमान केला जात आहे. तसेच सावरकरांचा अपमान हासुद्धा देशद्रोह असून सभागृहात आणि बाहेरही बोलताना  सदस्यांनी तारतम्य बाळगायला हवे असे सांगतानाच कालच्या घटनेबद्दल सत्ताधारी सदस्यांवर कारवाई होणार असेल तर गेले आठ महिने खोके, गद्दार म्हणून आमच्याविरोधात घोषणा देणा्ऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी   भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  घेतली. तसेच पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या देशात लोकशाही नाही असे तुमचे नेते म्हणतात. जर लोकशाही संकटात आहे, तर मग भारत जोडो यात्रा कशी झाली असा सवालही त्यांनी काँग्रेसला केला. तसेच आम्ही बोलत नाही याचा अर्थ बोलू शकत नाही असा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speaker rahul narvekar announced code of conduct for mla in legislative premises zws
Show comments