मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. हा संपूर्ण तपास महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्यावर विरष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद करण्यात आली होती. विरोधकांकडून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहायकांसह पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत महिला डॉक्टरने पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
याव्यतिरिक्त, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी आपल्यावर रुग्णालयातील वरिष्ठांकडून तसेच पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याची तक्रारही नोंदवली होती. या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटीकडे तपास सोपवण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या नावांचा समावेश असल्याने, विरोधकांनी सातत्याने या आत्महत्येच्या घटनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. स्थानिक सातारा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास झाल्यास त्यांच्यावर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने, निष्पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक नेमणे आवश्यक आहे, असा विरोधकांचा युक्तिवाद होता. अखेर, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विरोधकांची ही मागणी मान्य करत, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याचे निर्देश दिले.
