मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेदरम्यान होतो. परंतु यंदा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आल्याने केवळ वेतनामुळे आनंदावर विरजण पडू नये, म्हणून राज्य सरकारकडे एसटीच्या विविध सवलतीपोटीची प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील निर्णय घेण्यात आला असून लवकरच एसटीचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.
सण-उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवाशांसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यावर्षीचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सदिच्छा. एसटीच्या सर्व अधिकार व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सरनाईक यांनी दिल्या.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या राज्यातील हजारो प्रवाशांसाठी विविध सवलती योजना आहेत. या सवलतीमधून प्रवासी तिकीट दरात ३३ टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या सवलतींचे उत्तरदायित्व हे राज्य सरकारचे आहे. त्यामुळे ६७ टक्के ते पूर्णपणे तिकीटाचे भाडे हे राज्य सरकार भरते. एसटी महामंडळाला जुलै २०२५ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७७.५२ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे.
कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यावर्षी ७ सप्टेंबरपर्यंत ५,२०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून २३ ऑगस्टपासून जादा बस सोडण्यात येत आहेत. कर्तव्य पार पाडण्यासाठी राज्यातील विविध भागातून कर्मचारी मुंबई महानगरात आले आहेत. तसेच ते त्यांची सेवा देण्यासाठी येत असल्याने त्यांच्या घरातील गणपतीला जाता येत नाही. परंतु, या कर्मचाऱ्यांचा घरातील गणपती उत्साहास साजरा करता यावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वीच वेतन देण्यात येणार आहे.