मुंबई : परिचारिका संवर्गाच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या तपशीलात बदल करण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळेल. विद्यार्थ्यांना आता २१ मार्चपर्यंत अर्जाच्या तपशीलात सुधारणा करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन केले आहे. परिचारिका संवर्गातील बीएस्सी नर्सिंग, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी करताना काही उमेदवारांकडून अनावधनाने चुका झाल्या आहेत.

त्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या कार्यालयाकडे लॉगीन, दूरध्वनी, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयाला भेट देऊन विनंती केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जात नाव, जन्म तारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, लिंग इत्यादींमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगीनमधून अर्जाच्या तपशीलामध्ये २१ मार्च २०२५ पर्यंत सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे.

४८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

परिचारिका संवर्गातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया १५ मार्च रोजी, तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची परीक्षा ७ एप्रिल, तर पीएचएन, डीपीएन या अभ्यासक्रमांची परीक्षा ८ एप्रिल रोजी आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ४७ हजार ४९७, तर पीएचएन, डीपीएन अभ्यासक्रमासाठी ४७७ अशा एकूण ४७ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तपशील सुधारण्याची शेवटची संधी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तपशीलात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक सुधारणा कराव्यात. यानंतर तपशीलात सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार नाही, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गतवर्षी झालेले प्रवेश

बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ११ हजार २८० जागा असून, गतवर्षी ९ हजार २४४ जागांवर प्रवेश झाले होते. तसेच डीपीएन या अभ्यासक्रमासाठी पुणे व ठाण्यामध्ये प्रत्येकी एक अशी केवळ दोन महाविद्यालये असून, यासाठी ४० जागा आहेत. पीएचएन अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे एक महाविद्यालय असून ३० जागा आहेत. या एकूण ७० जागांपैकी ६९ जागांवर प्रवेश झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students have opportunity to make corrections in their nursing course applications mumbai print news zws