मुंबई : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) खारघर येथील ॲक्ट्रक येथे ११ मजली इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्रांपैकी एक केंद्र या इमारतीत सुरू करण्यात येणार असून, ते अत्याधुनिक कर्करोग उपचार तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. सामाजिक उत्तरदायित्व या इमारतीसाठी आयसीआयसीआय बँकेने ६२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपूर (नवीन चंदीगड) आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् येथे प्रत्येकी एक अशा तीन अत्याधुनिक कर्करोग केंद्रांची इमारत टीएमसीकडून बांधण्यात येणार आहे. या इमारती बांधण्यासाठी आयआयसीआय बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्वातून टीएमसीला १८०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला खारघर येथून सुरूवात झाली असून, या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी झाला.
या नव्या केंद्रामुळे ॲक्ट्रॅकमध्ये परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक उपचार देणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे वाढते रुग्ण पाहता देशात तातडीने आवश्यक असलेल्या वैद्यकीय, तांत्रिक आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठीही त्याचा वापर करण्यात येणार आहे. संस्थेच्या क्लिनिकल आणि ट्रान्सलेशनल रिसर्च क्षमतेसाठी हे केंद्र फायदेशीर ठरणार असल्याची माहिती ॲक्ट्रॅकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिली.
अशी असेल नवी इमारत
तळमजला आणि दोन तळघरे असलेली ही ११ मजली इमारत ३.४ लाख चौरस फुटांवर बांधण्यात येणार आहे. यामध्ये १२ अत्याधुनिक लिनिअर एक्सीलरेटर्स आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असतील. लिनिअर एक्सीलरेटर्स कर्करोगाच्या पेशींना अचूक रेडिएशन देत असल्यामुळे आसपासच्या निरोगी ऊतींचे कमी नुकसान होते. या रेडिएशन केंद्रामुळे दरवर्षी ७ हजार २०० रुग्णांना रेडिएशन थेरपीची सुविधा उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त वर्षभरात २५ हजार नवीन रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचाराची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. हे केंद्र २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विशाखापट्टणम, खारघर आणि मुल्लानपूर येथे तीन नवीन कर्करोग केअर रुग्णालये स्थापन करण्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथने टाटा मेमोरियल सेंटरला १८०० कोटी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार विशाखापट्टणम् पाठोपाठ खारघरमधील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रामुळे अधिकाधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. या केंद्रामुळे लहान मुलांना, तसेच प्रौढांना होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी केंद्र स्थापन करणे शक्य होईल. – डॉ. सुदीप गुप्ता, संचालक, टाटा मेमोरियल सेंटर