मुंबई/पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री-पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी आणि दिवसा आग ओकणाऱ्या सूर्यामुळे होणारी काहिली अशा विचित्र विषम हवामानाला सध्या अवघ्या महाराष्ट्राला तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील अनेक भागांत दिवसा आणि रात्रीच्या तापमानात २९ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक फरक दिसून येत आहे. जळगावात ही सर्वाधिक तफावत दिसून येत असून नाशिक, पुणे, मुंबई या शहरांतही तापमानातील लक्षणीय चढ-उतार नागरिकांना हैराण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली असली तरी थंडीने अद्यापही काढता पाय घेतलेला नाही. बहुतांश भागांत किमान तापमान १४ ते १६ अंशादरम्यान तर सगळीकडेच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाहाटे धुके, गारठा तर दुपारी कडाक्याचा उन्हाळा अशा टोकाच्या तापमाना स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात गुरूवारी नीचांकी किमान तापमान जळगाव येथे नोंदवण्यात आले. तेथे ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुणे येथे किमान ९.४ तर कमाल ३४.३ अंश सेल्सिअस, नाशिक येथे किमान १०.७ तर कमाल ३४.१, औरंगाबाद येथे किमान ११.७ तर कमाल ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. येत्या काही दिवसांत किमान तापमानातही हळूहळू वाढ होऊ लागेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल म्हणजे ३८ अंश सेल्सिअस अलिबाग येथे नोंदवण्यात आले तेथे किमान १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आजपासून स्थितीत बदल?

हवामानातील चढउताराचे चित्र शुक्रवारपासून बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसची वाढ होऊन तापमानातील तफावत कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांच्या मध्यंतराने थंडी पुन्हा येईल, त्यामुळे थंडी कायमची गेली असे समजू नये, असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रात्रीच्या गारठय़ाचे कारण

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जम्मू, काश्मीर, लडाख आणि हिमालय पर्वत प्रदेशात थंडी आहे. त्या प्रदेशातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण वगळता इतर भागांमध्ये रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीची नोंद होत आहे. पुणे शहरात बुधवारी रात्रीचे तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत तर जळगाव आणि काही भागांमध्ये ते सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याचे दिसून आले होते. 

आजारांना निमंत्रण

ऋतु बदलत असताना कमाल आणि किमान वातावरणात २० ते २२ अंशाचा फरक पडणे स्वाभाविक असल्याचे हवामानशास्त्रातील जाणकार सांगतात.  सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि ऑक्टोबरमध्ये एकसमान स्थिती असते. मात्र, अशा हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. दिवसभर ऊन्हाचा कडाका असल्याने डोक्यावर टोपी, सुती कापड घेणे, आहारात भरपूर पाणी आणि ताक, फळांचे ताजे रस घेणे यांचा उपयोग होईल, असे जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

तापमान असे..

मुंबईत कुलाबा केंद्रात किमान २१.२ अंश सेल्सिअस तर कमाल ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात किमान १८.२ अंश सेल्सिअस तर कमाल ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature fluctuations maximum 37 degree celsius and minimum 8 degree celsius in jalgaon ysh