मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे.
विचारे यांच्या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर एकलपीठाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठाने मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला. तसेच, विचारे यांची याचिका फेटाळली.
लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे म्हस्के यांना ७ लाख ३४ हजार २३१ मते मिळाली होती. तर विचारे यांना ५ लाख १७ हजार २२० मते मिळाली होती. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी, अशी मागणी विचारे यांनी याचिकेद्वारे केली होती.
विचारे यांचा आरोप काय होता ?
म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलेले नाही, असा दावा केला होता. प्रत्यक्षात, दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच, ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपीलही फेटाळले होते, असा आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता. आपल्यावर गुन्हेगारी खटले दाखल आहेत की नाहीत हे मतदारांना कळावे यासाठी उमेदवाराने उमेदवारी अर्जात त्याचा खुलासा करणे अनिवार्य आहे. परंतु, म्हस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली, असा दावाही विचारे यांनी केला होता.