पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धावत्या एक्स्प्रेसखाली ढकलून हत्या करणाऱ्यास रेल्वे पोलिस आणि गुन्हे शाखेने बारा तासात अटक केले आहे.
मुंबईकडे येणाऱ्या अवध एक्स्प्रेससमोर एका इसमाने पत्नीला ढकलून दिले. वसई रोड रेल्वे स्थानकात सोमवारी ही घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बारा तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय असल्याने आरोपीने हे कृत्य केले. आरोपी आणि त्याच्या पत्नीचे वारंवार घरगुती वाद होत होते. त्यातूनच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. यासह या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त संदिप भाजीभाकरे यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत सकाळी सहा वाजेपर्यंत बेस्ट सेवा ; नऊ मार्गांवर २५ विशेष बस

तपास कसा झाला ?
घटनेची माहिती मिळताच वसई रोड रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. गुन्हयांचे गांभीर्य जाणून लोहमार्ग पश्चिम परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सहा पथके तयार केली. त्याचबरोबर शेकडो सीसीटीव्हीचे चित्रीकरणही तपासले. मृत महिलेच्या अंगावरील कपडे, दागिने, चेहरापट्टी याची पाहणी करून ती कुठला असेल याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी हे जोडपे उत्तर भारतातील असल्याचे समजले. त्याचवेळी हा आरोपी भिवंडीत राहत असून रंगकाम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पकडण्यात आले.