मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ओपन टू ऑल पहिली विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागातून २ लाख ८२ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये कला शाखेसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ७४ हजार ७५ जागांपैकी फक्त ३४ हजार ६१३ जागांवरच प्रवेश झाले असून ३९ हजार ४६२ जागा रिक्त आहेत. मुंबई विभागातील एकूण जागांपैकी ५३.२७ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
यंदा मुंबई विभागात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी ४ लाख ५२ हजार १९७ जागा होत्या. यामध्ये कला शाखेसाठी ७४ हजार ७५, वाणिज्य शाखेसाठी २ लाख ३३ हजार ५७० आणि विज्ञान शाखेसाठी १ लाख ६५ हजार ५३५ जागा उपलब्ध होत्या. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमधील विविध महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी २० हजार ३९० जागा होत्या. त्यापैकी १० हजार ५५० जागांवरच प्रवेश झाला. ठाण्यातील २६ हजार २६० पैकी ११ हजार २१६ जागांवर, रायगडमधील १२ हजार १२० पैकी ५ हजार ३०० जागांवर आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ३०५ पैकी ७ हजार ५४७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे कला शाखेच्या तब्बल ३९ हजार ४६२ जागा रिक्त राहिल्या आहेत. यावरून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चारही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी कला शाखेकडे पाठ फिरवली आहे.
वाणिज्य शाखेच्या एकूण २ लाख ३३ हजार ५७० जागांपैकी ६०.११ टक्के म्हणजे १ लाख ४० हजार ४११ जागांवर प्रवेश झाले. या शाखेच्याही तब्बल ३९.८९ म्हणजेच सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईतील १ लाख १५ हजार १० जागांपैकी ७२ हजार ३६० जागांवर, ठाण्यातील ७१ हजार ९२० पैकी ४२ हजार ६०६ जागांवर, रायगडमधील १८ हजार २६० पैकी १० हजार २७८ जागांवर आणि पालघरमधील २८ हजार ३८० पैकी १५ हजार १६७ जागांवर विद्यार्थी प्रविष्ट झाले.
विज्ञान शाखेसाठी उपलब्ध असलेल्या १ लाख ६५ हजार ५३५ जागांपैकी ६४.९६ टक्के म्हणजेच १ लाख ७ हजार ५३८ जागांवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. विज्ञान शाखेतील ३५.०४ टक्के जागा रिक्त राहिल्या. पण इतर दोन शाखांच्या तुलनेत हे प्रमाण किंचित कमी आहे. यात मुंबईतील ६४ हजार २९० पैकी ४३ हजार ३०७, ठाण्यातील ६० हजार ५४० पैकी ३९ हजार १३, रायगडमधील १८ हजार ८०० पैकी १३ हजार ५२२ आणि पालघरमधील २१,९०५ पैकी ११,६९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
आतापर्यंतची प्रवेशाची आकडेवारी
शाखा—-जागा—-प्रवेशित—-रिक्त—रिक्त जागांची टक्केवारी
कला—७४,०७५—३४,६१३—३९,४६२—५३.२७
वाणिज्य—२,३३,५७०—१,४०,४११—९३,१५९—३९.८८
विज्ञान—१,६५,५३५—१,०७,५३८—५७,९९७—३५.०४
एकूण—४,५२,१९७—२,८२,५६२—१,६९,६३५—३७.५१