शिंदे – फडणवीस सरकारने मुंबईतील रस्त्यांचा विकास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत मेगा प्लान आखला आहे. त्यानुसार कामांचं भूमिपूजनही झालं आहे. मात्र, यावरून ठाकरे गटाचे युवानेता आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच, ज्या कंत्राटदाराला रस्त्यांचे कंत्राट देण्यात आले आहे, तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे म्हणाले की, खोके सरकारच्या कंत्राटदार मित्राला दिलेल्या नोटिसचा कालावधी संपून आठवडा उलटलाय. आज बृहन्मुंबई महानगर पालिकेसमोर ह्या कंत्राटदाराची सुनावणी होती. तिथे नेमकं काय घडलं, ह्याबाबत मुंबई महापालिकेकडून जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. तसंच, त्यांनी मुंबई महापालिकेला चार प्रश्नही विचारले आहेत.

  1. आज कंत्राटदाराची सुनावणी झाली की नाही?
  2. मुख्यमंत्र्यांचा मित्र असलेल्या ह्या कंत्राटदाराला कंत्राट घेऊनही काम न करण्याबद्दल ब्लॅकलिस्ट करणार का?
  3. की खोके सरकारशी झालेल्या तडजोडीनुसार फुटकळ कारणांच्या आधारे ह्या कंत्रादाराला बजावलेली नोटीस मुंबई पालिका मागे घेणार?
  4. मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यात १ हजार कोटींची कामे घेतलेल्या दुसऱ्या कंत्राटदारांबाबत मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यास देखील मी उत्सुक आहे.

“संबंधित कंत्राटदार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा आहे असं समजतंय. चिपळूणमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचे काम देखील ह्या कंत्राटदाराकडेच होते. मुंबई महानगरपालिकेची भूमिका जाणून घेण्यास उत्सुक आहोत. मेगा रोड स्कॅमवर आमचं लक्ष आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईतील रस्ते घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी सातत्याने आवाज उठवला आहे. सहा हजार कोटींच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला पण कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. रस्ते विकासासाठी मुंबईत ५ कंत्राटदार असून त्यापैकी एकाला टर्मिनेशनची नोटीस आली होती. या नोटीसीवर कंत्राटदाराने उत्तरही दिलं होतं. त्याची आज मुंबई महापालिकेत सुनावणी होणार होती. म्हणूनच आदित्य ठाकरेंनी वरील प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To a contractor who is a friend of the chief minister aditya thackeray asked four questions to the mumbai municipality in the road scam case sgk