मुंबई : शासकीय कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्यांना साशंकता वाटू नये, शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी माहिती अधिकाराद्वारे विविध माहिती मिळवणे शक्य आहे. मात्र, नुकताच माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिल्याने एका रेल्वे अधिकाऱ्याची बदली झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत की नाही किंवा त्याला कशाप्रकारे सामोरे जावे, अशी धास्ती अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) एच.एस. सूद यांनी माहिती अधिकाराच्या प्रश्नांना उत्तरे दिल्याने त्यांची बदली झाली आहे. विविध स्थानकांवर उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या प्रचंड खर्चाची माहिती देणे त्यांच्या बदलीचे कारण ठरले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सरकत्या जिन्यांबाबत विविध माहिती विचारली होती. त्यात मध्य रेल्वेच्या सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान १०१ एस्केलेटर आहेत. एका सरकत्या जिन्याचा वार्षिक देखभाल-दुरुस्ती खर्च २.९७ लाख रुपये आहे. तर, चर्चगेट ते विरार यादरम्यान १०६ सरकते जिने आहेत. एका सरकत्या जिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वार्षिक खर्च १.८५ लाख रुपये आहे. देखभाल-दुरूस्ती खर्चात कमालीची तफावत आणि प्रचंड प्रमाणात होणाऱ्या खर्चावर अनेकांनी बोट ठेवले. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सरकत्या जिन्याच्या खर्चातील विसंगतीमुळे एच.एस. सूद यांची बदली केल्याचे समजते आहे.

हेही वाचा >>>आमचा प्रश्न.. उत्तर मुंबई : रेल्वेची जीवघेणी वाहतूक कधी सुधारणार, माजी रेल्वे मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे समस्या सुटण्याची आशा

एच.एस. सूद यांची बदली ही रेल्वेच्या कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान अधोरेखित करते. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सरकत्या जिन्यांच्या देखभाल-दुरूस्ती खर्चातील असमानता ही अनेक कारणांनी असू शकते. याचा तपास करणे आवश्यक आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सूद यांना वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) या पदावर चार वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे त्यांची बदली केली असावी, असे मत मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

हेही वाचा >>>झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!

भारतीय रेल्वेमधील विविध विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’साठी उभारले. मध्य रेल्वेच्या पाच विभागातील महत्त्वाच्या ५० स्थानकात केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करण्यासाठी ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’साठी उभारले. यासाठी तब्बल १.२५ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. ही माहिती मध्य रेल्वेचे तत्कालीन मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली. त्यानंतर त्याची तडकाफडकी बदली केली. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांचा कालावधी साधारणपणे तीन वर्षांचा असतो. परंतु, डॉ. मानसपुरे यांना फक्त सात महिन्याच्या कालावधीत पदावरून हटवले.