मुंबई : करोनाकाळात बंद झालेली रेल्वेची मोबाइल तिकीट ॲप सेवा पुन्हा सेवेत दाखल झाल्यानंतर त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद वाढू लागला आहे. तिकीट खिडकी समोरील रांगेत उभे राहून तिकीट वा पास काढणारे प्रवासी आता हळूहळू कागदविरहित मोबाइल ॲप तिकीट सेवेला पंसती देऊ लागले आहेत. मार्च २०२२ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोबाइल ॲपद्वारे प्रतिदिन ७४ हजार तिकीटे काढण्यात आली असून मार्चमध्ये ॲपद्वारे ३६ हजार तिकीटे काढण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मतभेद आणि शाब्दिक बाचाबाचीच्या चर्चांवर प्रताप सरनाईकांसमोरच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दोघेही…”

करोना संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. टाळेबंदी काळात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी  देण्यात आली होती. निर्बंध असल्यामुळे अन्य प्रवासी लोकलमधून प्रवास करू नये यासाठी मोबाइल तिकिट ॲप सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये ॲप सेवा सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेमुळे ॲप सुविधा एप्रिल २०२१ ते २३ नोव्हेंबर २०२१ या काळात बंद ठेवण्यात आली होती. ही लाट ओसरताच मोबाइल तिकीट ॲप पुन्हा कार्यरत झाले. त्यानंतर या सेवेला प्रतिसाद वाढू लागला असून तिकीट खिडकीवरील रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाइल ॲपवर तिकीट काढणे प्रवासी पसंत करीत आहेत.

या ॲपद्वारे सप्टेंबर २०२२ मध्ये दररोज ७४ हजार तिकीट काढण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या मार्चमध्ये ३६ हजार तिकीटांची ॲपद्वारे विक्री झाली होती. ॲपद्वारे तिकीटे काढून मार्चमध्ये दररोज दोन लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र सप्टेंबरमध्ये यात दुपटीने वाढ झाली असून ती चार लाख २३ हजार इतकी आहे. मोबाइल ॲपवरून होणाऱ्या तिकीट खरेदीत सुमारे ४.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोबाइल ॲपवरून ८ टक्के तिकीटे काढली जात आहेत. ठाणे, कल्याण, दादर, कुर्ला, वडाळा, वाशी स्थानकातून मोबाइल ॲपवरवरून मोठ्या प्रमाणात तिकीट व पास काढण्यात येत आहेत.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवर  तिकीट काढण्याचे प्रमाण

तिकीट खिडकी – ६० ते ६५ टक्के

एटीव्हीएम – २० ते २१ टक्के

जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा (जेटीबीएस)- ८ ते ९ टक्के मोबाईल ॲप- ८ टक्के

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uts ticket booking app receives good response from passengers mumbai print news zws