मुंबई : वजन कमी करण्यासाठी नवी औषधे उपलब्ध झाली असली तरी त्यांचा दीर्घकालीन वापर अनेकांना परवडत नाही, तसेच दुष्परिणामांची भीतीही कायम आहे. त्यामुळे सुरुवातीला औषधांवर अवलंबून राहणारे अनेक रुग्ण काही महिन्यांतच उपचार थांबवतात, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी बारियाट्रिक सर्जरी किंवा मेटाबॉलिक सर्जरी भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. तथापि औषध घेऊन वजन कमी करण्याकडे अलीकडच्या काळात कल वाढलेला दिसत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार लठ्ठपणामुळे होणारे आरोग्याचे धोके गंभीर असून, भारतात सुमारे २३ टक्के नागरिक हे जास्त वजनाचे किंवा स्थूल आहेत. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) २५ पेक्षा जास्त असणाऱ्यांना स्थूलतेच्या श्रेणीत गणले जाते. स्थूलतेमुळे मधुमेह, हृदयरोग, फॅटी लिव्हर, कर्करोगाचा धोका आणि मानसिक ताणही वाढतो, हे संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. भारतात ओबेसिटीचे प्रमाण एनएफएचएस-५ च्या अहवालानुसार महिलांमध्ये सुमारे २४ टक्के आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण सुमारे २२.९ टक्के आहे. लिप्पीनकॉट जर्नलमधील ‘प्रेवलन्स ऑफ ओबेसिटी इन इंडिय ए सिस्टिमॅटित रिव्ह्यू’ या अभ्यासानुसार भारतात सुमारे 135 दशलक्षांपेक्षा जास्त लोक लठ्ठ आहेत. भारतात गेल्या दोन दशकात लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यामागे बैठी जीवनशैली, जंक फुड, व्यायामाचा अभवा तसेच पुरेशी झोप न मिळणे आदी कारणे आहेत. लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वेगाने वाढत असून जंक फुड व मैदानी खेळाचा अभाव हे यामागे प्रमुख कारण आहे.
गेल्या दोन दशकात भारतात ओबेसिटीवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी बारियाट्रिक सर्जरी किंवा मेटाबॉलिक सर्जरी केली जाते. या सर्जरीसाठी येणारा खर्च हा साधारणपणे तीन ते पाच लाख इतका असून आता एक वर्ग औषध घेऊन वजन कमी करण्याकडे वळताना दिसतो. ईली लिली व नोवो नॉर्डिस्क या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित केलेली मौंजारो आणि वेगोवी ही औषधे भारतात उपलब्ध झाली आहेत. यासाठी एका महिन्याचा खर्च १२ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत असल्याने सामान्य नागरिकांसाठी ती परवडणारी नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ उपचार सुरू ठेवणे अवघड ठरते. तज्ज्ञांच्या मते या औषधांचा वापर करताना मळमळ, उलटी, जुलाब, गॅस, पोटात वेदना अशा त्रासांचा सामना करावा लागतो. काही रुग्णांना पोटदुखी व पॅन्क्रियाटायटीससारखे गंभीर विकारही संभवतात. तसेच क्वचित प्रसंगी डोळ्यांच्या तपासणीची आवश्यकता भासते. त्यामुळे नियमित वैद्यकीय देखरेख महत्त्वाची मानली जाते. ही औषधे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात, पोट रिकामे होण्याचा वेग मंदावतात आणि त्यामुळे भूक कमी होते. रुग्णांनी औषधांबरोबर संतुलित आहार व नियमित व्यायामाची जोड दिल्यास वजन घटण्याचा वेग जास्त राहतो.
डेन्मार्क व व्हिएन्ना येथील अभ्यासानुसार या औषधांचा वापर करणाऱ्यांपैकी जवळपास निम्मे रुग्ण एका वर्षातच उपचार सोडतात. खर्च व दुष्परिणाम हीच दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे तीशीमधील तरुणांमध्ये ही औषधे घेण्याचा कल जास्त दिसतो. तज्ज्ञांच्या मते औषधांचा उपयोग सुरुवातीला होतो. पण दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. संतुलित आहार, व्यायाम व ताण-तणाव नियंत्रणाशिवाय स्थूलतेवर मात करणे कठीण आहे.जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच या औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या उपचारांना अधिक प्राधान्य मिळेल असा अंदाज आहे