राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबई आणि मुंबईकरांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. मुंबईने काय काय दिलं हे सांगतानाच त्या जुन्या आठवणीतही रमल्या . “गेली ५० वर्षे आम्ही मुंबईत राहतोय. या शहराने आम्हाला काय दिलं नाही”, असं म्हणत “नवराही इथलाच आणि मुलंही मुंबईच्या हॉस्पिटलमध्येच जन्माला आली”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज घाटकोपरमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात त्या बोलत होत्या.

“मुंबईचं नी माझं नातं काय? बेटांच्या शहाराला आज ब्रिजने जोडलं आहे. जगातून कुठूनही आलात तरी मुंबई त्याला पोटात घेते. मनाने खूप मोठी आहे ही मुबंई. संपूर्ण देशातून तुम्ही कुठेही मुंबईत फिरला तरी तुमचा गाववाला भेटतोच. या मुंबईने आपल्याला सगळ्यांना खूप काही दिलं आहे. जरा हटके, जरा बचके ये है मुंबई मेरी जान”, असं म्हणत त्यांनी मुंबई शहराचं तोंड भरून कौतुक केलं.

हेही वाचा >> महिला आयोगाकडे महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारी येतात? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला…”

“आम्ही १९७१ साली मुंबईत आलो. आम्ही मुंबईचे ओरिजनल नाही. जवळपास ५० वर्षे झाली आम्ही येथेच राहतो. या शहराने काय नाही दिलं? शिक्षण, आरोग्य, सुख-सुविधा दिलं. नवराही मुंबईचा भेटला आणि पोरंही मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये झाली. या लोकांचे ऋणानुबंध मी कधीच विसरणार नाही,” असं सांगत सुप्रिया सुळे आठवणीत रमल्या.

“एकदा मुंबईत राहिलं की दुसरी कुठे नाही राहत येत बाबा. एकदा मुंबईत राहायची सवय लागली तरी गावी गेल्यावर चार-पाच दिवसांतच अस्वस्थता वाटायला लागतं. गावी आराम केला, आता मुंबईच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात जाऊया, असं वाटत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> Video : “कोण संजय राऊत?”, भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न; नेमकं काय घडलं वाचा

“मुंबईचा माणूस घडाळ्याकडे बघत असतो, घडाळ्याच्या काट्यावर त्याचं आयुष्य चालतं. आता हा परिणाम पुढच्या निवडणुकीतही दिसला पाहिजे. त्याने नुसतं घडाळ्याला पाहायचं नाहीय. घडाळ्याचं बटनही दाबायचं. हे शिबिर आत्मचिंतन करण्याची आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

“वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स झालं तेव्हा शरद मुख्यमंत्री होते. तेव्हा सर्वांनी विरोध केला होता. मुंबई विकायला काढली आहे, असा आरोप करण्यात आला होता. मृणालताईंनी तेव्हा मोठं आंदोलनही केलं होतं. पण बीकेसीकडे अभिमानाने पाहिलं जातं. आज सर्वं ऑफिस बीकेसीत आहेत”, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीने मुंबई-पुण्यासाठी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला.