मुंबई : चाळीमध्ये स्वस्तात घर देण्याचे अमिष दाखवून एकाने घरकाम करणाऱ्या महिलेची सात लाखाची फसवणूक केल्याची घटना कांजूरमार्ग परिसरात घडली. याबाबत महिलेने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कांजूरमार्ग परिसरातील आदर्श नगर येथे पती आणि मुलांसह वास्तव्यास असलेली सदर महिला घरकाम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवते. गेल्या अनेक वर्षापासून त्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे अशी तिची इच्छा होती. ती परिसरात घर शोधत होती. मात्र कांजूरमार्ग परिसरात घरांच्या किमती अधिक असल्याने तिने अन्यत्र चाळीत घर शोधण्यास सुरुवात केली. याच वेळी पतीच्या मित्राने ठाण्यातील कोपर येथे सात लाख रुपयांमध्ये चाळीत घर मिळत असल्याची माहिती दिली.

सात लाख रुपयांमध्ये हक्काचे घर मिळेल या आशेपोटी महिला तत्काळ पतीला घेऊन घर पाहण्यासाठी गेली होती. घर पसंत पडल्यानंतर ते दाखवणाऱ्या इसमाने तत्काळ महिलेकडे कागदपत्र तयार करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. महिलेने त्याला तत्काळ पैसे दिले. यानंतर आरोपीने उर्वरित रक्कम महिलेकडून घेतली.

मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही महिलेला घराचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे महिलेने कोपर येथे जाऊन पैसे परत करण्याची मागणी केली असता आरोपीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबत कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.