मुंबई : ब्रेन स्ट्रोकमुळे कोमात गेलेल्या ३० वर्षीय महिलेला वेळेवर वैद्यकीय सहाय्य मिळाल्यामुळे जीवदान मिळाले. जवळपास महिन्याभराने कोमात गेलेली निकिता शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच तिने नुकत्याच जन्म दिलेल्या आपल्या बाळाला कुशीत घेतले. उपचाराच्या खर्चासाठी पतीने वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि इतर सेवाभावी संस्थांकडून वेळेवर मदत मिळाल्यामुळे निकितावर वेळेवर उपचार सुरू होऊ शकले.नाशिकमधील म्हसरूळ येथील निकिता पंकज पाटोळे (३०) यांना सहा वर्षांचा मुलगा असून, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, १३ फेब्रुवारीच्या रात्री निकिता यांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही क्षणांतच त्या बेशुद्ध पडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावातील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील श्री नारायणी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत निकिताला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाले. मेंदूच्या डाव्या बाजूस रक्तस्त्राव झाल्याने आणि सूज आल्याने त्या कोमात गेल्या. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. पाटोळे कुटुंबाकडे तीन लाख रुपयांचा आरोग्य विमा होता. मात्र, खर्चाची रक्कम त्यापेक्षा कितीतरी जास्त असल्याने आणि हातात रोख रक्कम नसल्याने पंकज आणि निकिताचे भाऊ योगेश जाधव यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला. या कठीण प्रसंगी त्यांना गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ४८ तासांत मदत

पंकज यांनी तात्काळ कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आणि कक्ष प्रमुखांच्या प्रयत्नांतून अवघ्या ४८ तासांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. त्यासह लिला हिरा सेवाभावी संस्था आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्थेकडून औषधांसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे निकिता यांच्यावर लवकर उपचार सुरू झाले.

बाळाला मिळाली मायेची ऊब

तब्बल २९ दिवसांनी कोमात असलेल्या निकिता यांना शुद्ध आली. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोमातून बाहेर पडलेल्या निकिताने आपल्या मुलीला प्रथमच जवळ घेतले, तेव्हा पंकज आणि माहेरच्या मंडळींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि मदत करणाऱ्या सर्व डॉक्टर व अधिकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, त्यांच्यामुळेच आमच्या कुटुंबाला आपली लेक, पत्नी आणि आई परत मिळाली अशी भावना पंकज पाटोळे व कुटुंबियांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman in coma after brain stroke survives after receiving medical assistance mumbai print news amy